फलटण : फलटण ते पुसेगाव रस्त्यावरील ताथवडा घाटात चाकू, कोयत्यासह घरावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून चाकू, कोयता, दुचाकी असा ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची माहिती अशी की, ताथवडा घाटात वारंवार लूटमारीच्या घटना होत असल्याने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फलटण ते पुसेगाव रस्त्यावर पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक गस्त घालत होते. या वेळी ताथवडा घाटाच्या दुसऱ्या वळणावर तीन दुचाकी व तेथे थांबलेले सहा जण दिसले. पोलीस वाहन पाहून त्यातील दोघे दुचाकीवरून पळून गेले. तेथे असलेल्या इतर चार जणांना ताब्यात घेतले.
यामध्ये योगेश बाजीराव मदने (वय ३०, रा. राजापूर, ता. खटाव), सनी उर्फ सोन्या धनाजी भंडलकर (२३, रा. चौधरवाडी, ता. फलटण), प्रथमेश उर्फ सोनू हणमंत मदने (२१, रा. उपळवे, ता. फलटण), किशोर हणमंत जाधव (१९, रा. ताथवडा, ता. फलटण) यांचा समावेश आहे. तर महेश उर्फ माक्या दत्तात्रय शिरतोडे (२५, रा. मोती चौक, फलटण) आणि किरण मदने (रा. राजापूर, ता. खटाव) हे पळून गेल्याचे ताब्यात घेतलेल्यांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून ८० हजार ४० रुपये किमतीची दुचाकी तसेच चाकू, कोयता अशी शस्त्रे जप्त केली. ही शस्त्रे जवळ बाळगून ताथवडा घाटात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर दरोडा घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. फरारी आरोपींचा शोध घेतला जात असून या आरोपींच्या चौकशीतून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलीस नाईक अभिजित काशीद यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख तपास करीत आहेत.