सातारा : लग्नघरी तसेच मंगल कार्यालयात पाळत ठेवून दागिने हातोहात लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या टोळीकडून तब्बल ११ लाख १० हजारांचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभिजित ऊर्फ नान्या तुळशीदास पवार (वय २५, रा. लिंब, ता. सातारा), प्रशांत ऊर्फ सोन्या बापूराव चव्हाण (२३, रा. दहिवडी), विशाल मदन मदने (२६, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातारा व सांगली जिल्ह्यांमध्ये लग्नाच्या दिवशी, लग्नघरी तसेच मंगल कार्यालयामध्ये बऱ्याच घरफोड्या झाल्या होत्या. चोरी करण्याच्या पद्धतीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यावेळी या तिघांवर पोलिसांचा दाट संशय बळावला. दि. १८ रोजी या तिघांना विविध ठिकाणी सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर सातारा व सांगली जिल्ह्यांत तब्बल २८ घरफोड्या केल्याची माहिती तपासात समोर आली. सातारा तालुक्यातील काशीळ येथील राहुल अग्रवाल यांच्या कुटुंबातील सर्व लोक २७ फेब्रुवारी रोजी लग्न कार्यासाठी पुणे येथे गेले होते. यावेळी या चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि ३४ हजारांची रोकड चोरून नेल्याची कबुलीही पोलिसांना दिली आहे. सांगली जिल्ह्यातही सुमारे एक वर्षापासून अशा प्रकारच्या घरफोड्या होत होत्या. त्यामुळे या आरोपींकडून या घरफोड्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान, या तिघांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सोमवार, दि. २५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (प्रतिनिधी) दागिने चोरीस गेलेल्या कुटुंबीयांना आवाहन लग्न सोहळ्यातून किंवा घरातून ज्यांचे लग्नादिवशी दागिने चोरीस गेले आहेत, अशा लोकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लग्न सोहळ्यातून दागिने चोरीस गेल्यानंतर वधू-वराकडील लोक एकमेकांकडे संशयाने पाहत होते. मात्र, या टोळीचा पर्दाफाश झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
लग्नघरी दागिने चोरी करणारी टोळी गजाआड
By admin | Published: July 25, 2016 12:27 AM