कराड : शाळेतील एलईडी टीव्ही चोरणारी टोळी कराड तालुका पोलिसांनी गजाआड केली. शेरे जिल्हा परिषद शाळेतून सहा एलईडी टीव्ही चोरणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्री ही कारवाई केली.
दरम्यान, संशयितांकडून पोलिसांनी दोन टीव्ही जप्त केले आहेत. संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ऋतुराज संजय निकम (वय २०), अजिंक्य संजय गावडे (वय १९), रोहित अरुण सावंत (वय १९), धनराज बाबूराव मोटे (वय २५, सर्व रा. शेरे, ता. कराड) व आकाश प्रभाकर शेळके (वय २१, रा. कार्वे, ता. कराड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरे येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामपंचायतीने जानेवारी २०२०मध्ये सहा एलईडी टीव्ही दिले आहेत. दरम्यानच्या कालावधीत शाळा बंद असताना संशयितांनी शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये लावलेले टीव्ही चोरट्यांनी चोरून नेले. चोरलेल्या टीव्हीची कार्वे येथे दोन, तुळसण येथे एक, जत येथे एक अशी विक्री केली. ३ ऑगस्ट २०२१ रोजी ही बाब लक्षात आल्यानंतर शाळेचे शिक्षक प्रकाश फल्ले यांनी याबाबतची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून तपास करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेरे येथील चार व कार्वे येथील एकाला अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार, शशिकांत घाडगे, सचिन निकम तसेच धनंजय कोळी यांनी ही कारवाई केली. अधिक तपास मिलिंद बैले करत आहेत.