सातारा : पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा पिस्टल बाळगणे, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी अशाप्रकारचे विविध गुन्हे दाखल असलेल्या तिघांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे.नितीन भिमराव खरात (वय २६, टोळी प्रमुख), रामा उर्फ श्रीकांत हणमंत मदने (वय २६, रा. पुसेगाव, ता. खटाव), सुरज उर्फ पप्पू भिमराव घुले (वय ३९, रा. गोडोली, ता. सातारा) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, या तिघांची टोळी तयार झाली होती. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नव्हती. पुसेगाव, ता. खटाव परिसरात त्यांच्याकडून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होत होता. त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून होत होती. सातारा जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यात या तिघांकडून हिंसक घटना घडू नयेत म्हणून पुसेगाव पोलिसांनी या तिघांना हद्दपार करण्यात यावे, असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर अधीक्षक सातपुते यांनी मंजुरी देऊन या तिघांना सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात अशाच प्रकारे समाजामध्ये दहशत पसरविणाऱ्या टोळ्यांविरूद्ध हद्दपारीची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.