रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील किरोली(वाठार) येथील ऊस वाहतूकदाराला ऊसतोडणीसाठी मजूर देतो, अशी बतावणी करून दोन ऊस टोळी मुकादमांनी ९ लाख ६५ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात पाचजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
गजानन बबन कांबळे व अलका बबन कांबळे (दोघेही रा. सावरगाव (जिरे), ता. जि. वाशीम) तसेच अनिल बंडू राठोड (वय ५३), अतिश विजय राठोड (३५), हरिश्चंद्र तारासिंग पवार (३८ सर्व रा. गोस्ता, पोस्ट. रुई, ता. मानोरा, जि. वाशिम) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऊस वाहतूकदार हणमंत पंढरीनाथ चव्हाण (रा. किरोली, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. २७ ऑगस्ट ते दि. २८ सप्टेंबर २०२० रोजीच्या दरम्यान टोळी मुकादम गजानन कांबळे व अलका कांबळे या दोघांनी ऊसतोडणीसाठी अकरा मजूर देतो म्हणून ४ लाख ६५ हजार रुपये वाशीम जिल्ह्यातील रिसोड व कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर हद्दीत घेतले. मात्र, त्यानंतर वारंवार ऊसतोडणीसाठी मजूर देण्यासाठी विनंती केली असता दोघांनी टोलवाटोलवीची उत्तरे दिली. ऊसतोडणीसाठी मजूर देत नसल्यामुळे घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली असता, पैसेही दिले नाहीत.
तसेच दि.१ मे ते दि.२० ऑक्टोबर २०२० या दरम्यान अनिल राठोड, अतिश राठोड व हरिश्चंद्र पवार या तिघांनी संगनमताने ऊसतोडणीसाठी दहा कोयते देतो, असे म्हणून ठिकठिकाणी पाच लाख रुपये घेतले; परंतु वारंवार मागणी करूनसुद्धा तोडणीसाठी कोयते दिले नाहीत व घेतलेले पैसेही परत दिले नाहीत. फसवणूक केल्याप्रकरणी पाचजणांवर पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सावंत करत आहेत.