सातारा : कळंबा जेलमधून बोलतोय, जामीनासाठी पैसे दे. तसेच तु दिलेली केस मागे घेऊन ५० हजार दे, नाही तर आत बसून पण तुला खल्लास करु शकतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी गुंड लल्लन जाधव, युवराज जाधवसह चौघांवर शहर पोलिसांत खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विक्रम अश्रू वाघमारे (रा. संगमनगर, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार लल्लन उर्फ अजय दत्तात्रय जाधव, युवराज रामचंद्र जाधव, दत्ता काशीनाथ आसावरे आणि बंटी उर्फ राजू नवनाथ लोमटे (सर्व रा. प्रतापसिंहनगर, सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी संशयितांनी अनोळखी मोबाइलवरुन तक्रादाराला काॅल केला. त्यावरुन कळंब्यातून बोलतोय आमच्या जामिनासाठी ३० हजार रुपये दे, नाहीतर तुला जीवे मारीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर ४ एप्रिलला सकाळच्या सुमारासही अनोळखी मोबाईलवरुन तक्रारदाराला फोन करण्यात आला. त्यावेळीही मी कळंबा जेलमधून बोलतोय. तु दिलेली केस मागे घे. मी आत बसूनही खल्लास करु शकतो, अशी धमकी देण्यात आली.त्यानंतर आमचे घर पाडले. यासाठी ५० हजार रुपये खर्च तू देशील अशी धमकी देण्यात आली.या प्रकारानंतर विक्रम वाघमारे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक आबनावे हे तपास करीत आहेत.
कळंबा जेलमधून बोलतोय; खल्लास करीन म्हणत पैशाची मागणी; गुंड लल्लन, युवराज जाधवसह चौघांवर खंडणीचा गुन्हा
By नितीन काळेल | Published: April 05, 2024 6:18 PM