कऱ्हाड : ‘गँगवॉर’मुळे अशांत झालेल्या कऱ्हाड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आखाड्यातही ‘गँगवॉर’ पाहायला मिळाले. मतदारांची रांग लावण्याच्या कारणावरून हजारमाची, ता. कऱ्हाड येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींची मारामारी झाली. या प्रकारामुळे मतदान केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत मारामारी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने तणाव निवळला. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अक्षय सयाजीराव डुबल (वय २४) व प्रशांत बाळासाहेब माने (वय २७, दोघेही रा. हजारमाची, ता. कऱ्हाड) अशी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असणाऱ्या पोलीस नाईक मिलिंद पाटील यांनी याबाबतची फिर्याद शहर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजारमाची ग्रामपंचायतीसाठी मंगळवारी मतदान होते. गावातील वॉर्ड क्र. ३ मधील मतदारांसाठी न्यू इंग्लिश स्कूलच्या खोली क्र. ५ मध्ये मतदान केंद्र होते. सकाळची वेळ असल्याने मतदारांचा प्रतिसादही चांगला होता. मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. अशातच सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अक्षय डुबल व प्रशांत माने हे उमेदवारांचे प्रतिनिधी त्याठिकाणी आले. मतदारांच्या रांगा लावण्याच्या कारणावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे पर्यवसान मारामारीत झाले. ही घटना निदर्शनास येताच महिला मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक धनाजी पिसाळ कर्मचाऱ्यांसह तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मारामारी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन केंद्रापासून बाहेर नेले. तसेच त्यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्यावर पोलिसांसमोर मारामारी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)+अधिकाऱ्यांची धावहजारमाची मतदान केंद्र परिसरात मारामारी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी तातडीने संबंधित मतदान केंद्रास भेट दिली. त्यांनी जमाव पांगविल्याने परिसरातील तणाव निवळला. तसेच मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू झाली. अशांत कऱ्हाडात सोमवारीच पोलिसांना मारहाण झाली होती. निवडणुकीतही कऱ्हाड अशांतच ठरले.
राजकीय आखाड्यातही ‘गँगवॉर’
By admin | Published: August 04, 2015 11:14 PM