फलटण : जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, फलटण पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गजीनृत्य संमेलनाचे उद्घाटन रविवारी आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते झाले. येथील घडसोली मैदानावर भरलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमित कदम, महिला व बालकल्याण समितीच्या कल्पना मोरे, समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे, माणच्या सभापती सीमा जगताप, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) टी. आर. गारळे, फलटणच्या सभापती स्मिता सांगळे, उपसभापती पुष्पा सस्ते, गटविकास अधिकारी नीलेश काळे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी स्वाती इथापे आदी उपस्थित होते.आमदार चव्हाण म्हणाले, ‘गजनृत्य कला ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध मातीत रुजली व वाढली. मात्र, ही कला आता लोप पावू लागली आहे. तिला राजाश्रय मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने भरविलेले गजीनृत्य संमेलन राज्याला दिशा देणारे आहे. धनगर समाजाला ऐतिहासिक परंपरा असून, हा समाज देशभर विखुरला आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी समाजसेवा, देशसेवा करत आदर्श राज्य निर्माण केले आहे. धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’सोनवलकर म्हणाले, ‘जिल्हा परिषदेच्या अनुदानातून गजीनृत्य संमेलन जिल्ह्याच्या इतिहासात फलटण येथे प्रथमच होत आहे. लोकनृत्याची कला कायम राहावी, यासाठी गजीनृत्य संमेलन भरविण्याची परंपरा टी. आर. गारळे यांची असून, ते प्रत्यक्षात आणण्याचे काम जिल्हा परिषदेने केले आहे.’माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, भीमराव बुरुंगले, गुलाबराव दडस यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या संघांनी यावेळी कला सादर केली. जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे, शिवाजी गावडे, पंचायत समितीच्या सभापती स्मिता सांगळे यांनी स्वागत केले. समाजकल्याण सभापती मानसिंगराव माळवे यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
फलटणमध्ये घुमला गजीनृत्याचा ढोल
By admin | Published: March 22, 2015 10:43 PM