लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सर्वसामान्य नागरिकांना संचारबंदीचा जसा फटका बसला, तसाच फटका गॅरेज चालक व वाहनधारकांनादेखील बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून लाखो वाहने एकाच जागी उभी आहेत. त्यामुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर गॅरेज बंद असल्याने गॅरेज चालक व तेथील कारागिरांची उपासमार सुरू आहे.
सातारा जिल्हा राज्यात रेड झोनमध्ये गेलेला आहे. येथील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर केले जात आहेत. या संचारबंदीची झळ हातगाडीधारक, किरकोळ विक्रेते, फळ विक्रेते व हातावर पोट असणाऱ्यांना बसली. तसेच वाहनधारक व गॅरेज चालकांनादेखील याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
संचारबंदीमुळे जिल्ह्यातील सर्व गॅरेज सध्या बंद आहेत. शिवाय लाखो रुपयांची वाहने पार्किंग व रस्त्यावर उभी आहेत. जी वाहने रस्त्यावर धावत आहेत त्यांच्यात काही बिघाड झाला तर दुरुस्ती कुठे करायची, हा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. पार्किंगमध्ये धूळखात पडलेल्या वाहनांमध्येदेखील इंजिन, बॅटरी व इतर तांत्रिक अडचणी येऊ लागल्या आहेत. एकीकडे वाहनचालकांचे नुकसान तर दुसरीकडे गॅरेजचालकांनी उपासमार अशी परिस्थिती संचारबंदीत निर्माण झाली आहे.
(चौकट)
वाहने पार्किंगमध्ये
संचारबंदीचा फटका वाहनांनादेखील बसला आहे. कोणाच्या गाड्या पार्किंगमध्ये तर कोणाच्या रस्त्यावरच उभ्या आहेत. गाडी चालली नाही तर इंजिनला फटका बसू शकतो. हे नुकसान कोण भरून काढणार? आम्ही संचारबंदीचे काटेकोर पालन करीत आहोत. केवळ कामासाठीच घराबाहेर जात होतो. गेल्या दीड महिन्यात गाडीचा कमीतकमी वापर केला. आता तर गाडी पार्किंगमध्ये पडून आहे. गाडी बंद असल्याने बॅटरीचे नुकसान होत आहे, असे मत वाहनधारकांनी व्यक्त केले.
(चौकट)
वाहनधारकांसमोर अडचणींचा डोंगर
सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने संचारबंदीची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. कारवाईच्या धास्तीने बहुतांश वाहनधारकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे. अनेकांच्या घरात ५० हजारांपासून ५० लाखांपर्यंतच्या गाड्या आहेत. या सर्व गाड्या गेल्या एक - दीड महिन्यापासून जागेवर उभ्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांसमोर अडचणींचा डोंगर वाढू लागला आहे.
(चौकट)
गॅरेज बंद असल्याने अडचणी
जिल्ह्यात दहा लाखांच्या आसपास वाहने आहेत. संचारबंदीच्या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेशी निगडित वाहने रस्त्यावरून धावत आहेत. टायर पंक्चर होणे, इंजिन बंद पडणे, बॅटरीत बिघाड होणे अशा अनेक अडचणींना वाहनधारकांना तोंड द्यावे लागत आहे. गॅरेज बंद असल्याने एखादे वाहन जर बंद पडले तर करायचे काय, असा प्रश्न अनेकांपुढे उभा राहत आहे.
(कोट)
आमच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सततच्या संचारबंदीमुळे गॅरेज व्यवसाय पूर्णतः बंद झाला आहे. शासनाकडून आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. घरखर्च भागविणे सध्यातरी जिकिरीचे बनले आहे.
- अमित शिंदे, सातारा
(चौकट)
आमच्या गॅरेजमध्ये ग्रामीण भागातील दोन-तीन मुले काम करतात. संचारबंदीचा आम्हाला व कारागिरांना मोठा फटका बसला आहे. शासनाने गॅरेज सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेणे गरजेचे आहे.
- राहुल उतेकर, महाबळेश्वर
* आकडेवारीची चौकट देणार आहे.
* डमी ७४२ : २५ सचिन टेम्पलेट/ प्रूफ