सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या साताऱ्यातील सेवा रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग पडलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण झालेली आहे.
येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते वाढे फाटा दरम्यानच्या पश्चिमेकडील सेवा रस्त्याच्या बाजूला कचरा पडला आहे. काहीवेळा कचऱ्यातील प्लास्टिक कागद रस्त्यावर येत असतात. तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारक, नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
...................
वाहन अपघातामुळे गतिरोधकाची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ भरधाव वाहनांमुळे अपघात घडत आहेत. त्यामुळे संबंधितांनी येथील रस्त्यावर गतिरोधक उभारावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
येथील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ चार रस्ते एकत्र येत आहेत. रस्ता चांगला असल्याने अनेक वाहने भरधावपणे येत असतात. त्यातच आडव्या बाजूंनी येणारी वाहने दिसत नाहीत. परिणामी वाहनांचा अपघात होण्याच्या घटना घडत आहे. यासाठी गतिरोधकची मागणी होत आहे.
......................................................
अवजड वाहनांना गर्दीवेळी बंदी करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहरातील मोती चौक परिसरात गर्दीच्यावेळीही अवजड वाहने येत असतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. अशा वाहनांना गर्दीवेळी बंदी करावी, अशी मागणी होत आहे.
शहरातील मोती चौक परिसरात अनेक दुकाने आहेत. त्यामुळे सातारकरांची खरेदीसाठी सायंकाळच्या सुमारास गर्दी होते. याचदरम्यान एखादे अवजड वाहन आले तर वाहतूक संथगतीने सुरू होते. त्यामुळे गर्दीवेळी तरी अवजड वाहनांना प्रवेश देऊ नये. तसेच या काळात वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत आहे.
...............................