पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग सहापदरी झाल्यामुळे सुसाट झाला आहे. मात्र, त्याचवेळी या मार्गावरून प्रवास करणारे वाहनातून कचरा टाकत असतात. त्यामुळे साताऱ्यातील वाढे फाट्याजवळ कचरा साठला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. (छाया : जावेद खान)
००००००००
जेवणावळीवर भर
सातारा : ग्रामपंचायत निवडणुका रंगात आल्या आहेत. त्यामुळे मतदारांना खूष ठेवण्यासाठी जेवणावळीचे आयोजन केले जात आहे. त्यासाठी अनेकांनी ढाबे ठरवून दिले आहेत. या प्रकारामुळे सर्वसामान्य ग्रामस्थांतून मात्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
००००००
पाणीपुरवठा विस्कळीत
सातारा : साताऱ्यातील काही भागांना पाणीपुरवठा केला जात असलेल्या शहापूर योजनेतील पंपाचे अपग्रेडेशनचे काम सुरू असल्याने त्याचे काम करण्यात आले. यामुळे शनिवारी काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही ठिकाणी विस्कळीत स्वरुपात झाला. त्यामुळे एक दिवस संबंधित भागातील सातारकरांना त्रास सहन करावा लागला.
०००००
मुले कॅरम खेळण्यात मग्न
सातारा : कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळा-महाविद्यालये बंद ठेवली आहेत. त्यामुळे मुले घरात बसूनच अभ्यास करीत आहेत. मात्र एक-दोन तासांत अभ्यास संपत असल्याने काही घरांमधील मुले बैठे खेळ खेळण्यात दंग आहेत. यामध्ये कॅरम, लुडोला प्राधान्य दिले जात आहे.
०००००००
एसटीची गरज
सातारा : सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये एसटी जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागात एसटीच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे.
००००
मुंबईकरांना निमंत्रण
सातारा : सातारा जिल्ह्यातील अनेक भागातील तरुणाई मुंबई रोजगारासाठी स्थायिक झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या गावातील नेते मंडळी संबंधित गावातील मुंबईकरांना मतदानासाठी आठवणीने येण्याबाबत निमंत्रण पाठवित आहेत. गाड्यांची सोय केली जात आहे.
००००००
सातारकरांची वाहने थेट आठवडा बाजारात
सातारा : साताऱ्यातील जुन्या मोटार स्टॅण्ड परिसरात दर रविवारी आठवडा बाजार भरत असतो. ही मंडई बंदिस्त आहे. तसेच असंख्य शेतकरी खालीच वस्तू विकण्यासाठी बसलेले असतात. तरीही काही सातारकर या अवस्थेतही दुचाकी गाड्या बाजारात घालत असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
०००००००
खारका बोरे दाखल
सातारा : साताऱ्यातील बाजारपेठेत खारका बोरे दाखल होत आहेत. सातारा शहर परिसरात डोंगररांगा मोठ्या प्रमाणावर असल्याने गावरान बोरे मोठ्या संख्येने असतानाही शहरात मात्र खारका बोरेच येत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. बोरे काढण्यासाठी काहीजण जंगलात जात असतात.
०००००००००
घाटात वाहनांच्या रांगा
सातारा : शनिवार, रविवार असल्याने मुंबईकर गावी सातारा जिल्ह्यात येत असतात. दोन दिवसांची सुटी संपत आल्यानंतर रविवारी सायंकाळी सातारकर परतीच्या प्रवासाला लागले. त्यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाट परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
०००००
मोबाईलमुळे त्रस्त
सातारा : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. त्यामुळे मोबाईल प्रत्येक मुलांच्या हाती आला आहे. पण दोन तासांचा अभ्यास असतो. उर्वरित वेळेत मुले गेममध्ये रमत असतात. त्यामुळे पालकांची डोकेदुखी वाढू लागली आहे. शाळा कधी सुरू होतात, याकडे लक्ष लागले आहे.
०००००००
पुलाखाली पाणी
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीनंतर ढगेवाडी फाटा परिसरात अनेकदा पाणी साठलेले असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये-जा करताना अडचणीचा सामना करावा लागतो. पाण्यातूनच मार्ग काढावा लागतो.
०००००००००
साईडपट्ट्या खचल्या
नागठाणे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग प्रशस्त आहे. मात्र, त्यापासून ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत. त्यामुळे समोरून वाहने आल्यास वाहन कोणी खाली घ्यायचे यावरून वादावादी घडते.
००००००
धोकादायक पद्धतीने ऊसाची वाहतूक
सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे ऊस वाहतूकही तेजीस सुरू आहे. मात्र, कमी फेऱ्यांमध्ये जास्तीत जास्त ऊस वाहतूक करता यावी यासाठी दोनदोन ट्रॉली लावली जाते. या ट्रॉली झोल देत असल्याने इतर वाहनांना घासत आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका आहे. तसेच काही ट्रॅक्टरला परावर्तित पट्ट्या, कापडही लावलेले नसते. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.
०००००
लोखंडी अँगल गायब
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जनावरे तसेच स्थानिक पादचारी येऊ नयेत, यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी संरक्षक जाळ्या लावलेल्या आहेत. मात्र, स्थानिक भंगार व्यवसायिक ते काढून नेत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे अँगल गायब झाले आहेत
०००००
वडाप वाहतूक तेजीत
सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ वडाप व्यवसायही तेजीत चालत आहेत. ठरावीक मार्गावरील एसटी बसस्थानकातून बाहेर येण्यापूर्वीच वडापचालक प्रवासी घेऊन जात आहेत. त्यामुळे एसटीला फटका बसतो.
००००००
ग्रेड सेपरेटरमध्ये फेरफटकासाठी रात्री गर्दी
सातारा : साताऱ्यातील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटर सर्वसामान्यांसाठी शुक्रवारी खुला करण्यात आला आहे. सातारकरांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न यामुळे पूर्ण झाले आहेत. यामुळे अनेक सातारकर काहीही काम नसताना कुटुंबीयांना, लहान मुलांना घेऊन ग्रेड सेपरेटरमध्ये येत आहेत. तिन्ही मार्गांवरून फेरफटका मारून ते परत घरी जात आहेत. पण हे करीत असताना काही तरुण एकेरी नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे. अशांवर कारवाईची गरज आहे.