शेंद्रे : सातारा नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोतील कचरा काही दिवसांपासून डेपोच्या बाहेर येत आहे. आता तर कचराडेपोची असणारी संरक्षक भिंत पडून डेपोतील कचरा बाहेर आला असून, तो शेंद्रे-बोगदा रस्त्यालगत येत आहे.
सातारा नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोविरोधात स्थानिक नागरिकांची कायम तक्रार असते.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच कचराडेपोतील कचरा मुख्य प्रवेशद्वारामधून बाहेर रस्त्यापर्यंत आला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सातारा नगरपालिकेने या परिसराची तत्काळ स्वच्छता केली होती. परंतु, या ठिकाणी योग्य ती खबरदारी न घेतल्याने पुन्हा एकदा या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. सातारा नगरपालिकेमार्फत डेपोमध्ये कचऱ्याचे वर्गीकरण सुरू असून, कचऱ्याचे वर्गीकरण करताना प्लास्टिकचा, मातीचा व इतर कचऱ्याचा ढीग तयार करताना तो संरक्षक भिंतीला घासून लावण्यात आलेला आहे. त्या कचऱ्याचा संरक्षक भिंतीवर दाब पडल्याने संरक्षक भिंत तुटून तो कचरा संरक्षक भिंतीच्या बाहेर आला आहे. हा कचरा बाहेर आल्याने रस्त्यालगत प्लास्टिक व इतर घाण येत असल्याने या परिसरात वाहतूक करताना अडचणी येत आहेत. तरी पालिकेने याची तत्काळ दखल घेऊन या संरक्षक भिंतीचा भाग पुन्हा बांधून घेऊन बाहेर असणारा कचरा तत्काळ डेपोमध्ये टाकण्यात यावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
२६शेंद्रे
फोटो : सोनगाव कचरा डेपोची संरक्षक भिंत पडल्याने डेपोतील कचरा बाहेर आला आहे. (छाया : सागर नावडकर)