सातारा : मंगळवार पेठ, चिपळूनकर कॉलनी, धस कॉलनी आणि समर्थमंदिर परिसरातील तारळेकर ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्यामुळे ओढ्यातील पाण्याचा प्रवाह बंद झाला असून, दुर्गंधीमुळे नागरिकांना नाहक सामना करावा लागत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व ओढ्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
भटक्या जनावरांमुळे नागरिक हैराण
सातारा : शहरा व परिसरात भटक्या जनावरांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने, रहदारीच्या ठिकाणी वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील भाजी मंडई बंद असल्याने राधिका रस्ता, गोल मारुती व समर्थ मंदिर परिसरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे.
गुरुवार परजावरील रस्ता पुन्हा खड्ड्यात
सातारा : येथील गुरुवार परज परिसरातील अंतर्गत रस्त्यांची गेल्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पालिकेने काही महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण केले. मात्र, अल्पावधीत रस्त्यांची अवस्था जैसै थे झाली असून, ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. हे खड्डे चुकविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालिकेने या खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
जावळी तालुक्यात पाणीपातळी खालावली
मेढा : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागली असून, जावळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींच्या पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. तालुक्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने, त्याचा भुजलपातळीवर मोठा परिणाम झाला आहे. मे महिन्यात परिस्थिती आणखीन गंभीर होण्याची चिन्हे आहेत.