लोकमत न्यूज नेटवर्क
कऱ्हाड : कोरोनाच्या संकटामुळे सारेच वातावरण विस्कळीत आहे. अशा वातावरणातच कऱ्हाड, साताराच्या राजकारणात एक घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीसी, ओबीसी सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसने माळींच्या गळ्यात ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ घातली आहे. त्याचे अधिकृत पत्र नुकतेच त्यांना दिले गेले आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे याची राजकीय वर्तुळामध्ये फारशी कोणी वाच्यता केलेली दिसत नाही.
काले (ता. कऱ्हाड) येथील भानुदास माळी हे शरद पवार यांचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. ते आजवर नेहमीच शरद पवार यांच्याबरोबरच राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष, त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यभर फिरून पक्षबांधणीसाठी योगदान दिले आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात ते राष्ट्रवादी अंतर्गत राजकारणामुळे थोडेसे नाराज दिसत होते. याच नाराजीचा फायदा काँग्रेसने करून घेतलेला दिसतोय.
कऱ्हाड दक्षिणचे आमदार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संमतीशिवाय भानुदास माळी यांचा पक्षप्रवेश किंवा निवड होऊच शकत नाही, हे निश्चित! मात्र, त्यांनीदेखील याबाबत कोणतेच भाष्य केलेले नाही. पण कऱ्हाड दक्षिणमधील ओबीसी मतदार आपल्या पाठीशी राहावा, यासाठी त्यांनी शांतपणे एक पाऊल पुढे टाकलेले दिसते.
भानुदास माळी व त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत दोनदा बैठक झाल्याचे खात्रीशीर समजते. त्यात सकारात्मक चर्चा झाल्यानंतर १४ एप्रिल रोजी मुंबई येथे भानुदास माळी यांनी समर्थक पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर नुकतेच १ मे रोजी त्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र देण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष नसीम खान, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, देवानंद पवार, आदी नेते उपस्थित होते.
भानुदास माळी यांनी त्यांचे समर्थक असलेल्या ओबीसी सेलच्या पंधरा आजी-माजी जिल्हाध्यक्षांना घेऊन काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश हा राष्ट्रवादीला चिंतन करायला लावणारा आहे. काँग्रेस पक्षाने माळी यांचा राजकीय अनुभव लक्षात घेऊन ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्षपद त्यांना दिले आहे. आता काँग्रेसला त्यांच्या अनुभवाचा किती फायदा होतो, हे पाहावे लागेल.
चौकट
राज्यात सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे महाविकास आघाडी सरकार आहे. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीतील सख्ख्य साऱ्यांनाच माहीत आहे. त्यातल्या त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादीचे नेते यांचे नाते सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत कऱ्हाड दक्षिणमधील राष्ट्रवादीचे भानुदास माळी यांची काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड नक्कीच चर्चेची आहे.
चौकट
कोरोनामुळे नाही जाहीर कार्यक्रम...
खरंतर भानुदास माळी यांच्या पक्षप्रवेशाचा मोठा कार्यक्रम घेण्याचे काॅंग्रेसमध्ये ठरले होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते शक्य झाले नाही. आता प्रदेशाध्यक्षपदी निवडी जाहीर झाल्यानंतर जाहीर सत्कार समारंभही घेता येत नसल्याचे समर्थक सांगतात.
फोटो :काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष निवडीचे पत्र भानुदास माळी यांनी स्वीकारले.