लोणंद : लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गुरुवारी ७०० पिशव्या कांद्याची आवक होऊन गरव्याचा दर ११ हजार रुपये प्रति क्विंटल निघाला. तर हळव्यानेही दहा हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, सध्या कांद्याचा किलोचा दर सफरचंदापेक्षाही महाग झाला असल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
कांद्यासाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव तालुक्यांतील कांदा येतो. तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर व बारामती तालुक्यातील शेतकरी आपला कांदा लोणंदच्या बाजारात विक्रीसाठी आणतात. या भागातून येणाºया चविष्ट कांद्याला देशभरातून प्रचंड मागणी असते. त्यामुळे लोणंदच्या कांद्याने देशात नावलौकिक मिळविला आहे. बाजार समितीच्या आजपर्यंतच्या उलाढालीत गुरुवारच्या बाजारातील ११ हजार रुपये क्विंटलच्या दराने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झालं आहे. काढणीला आलेला कांदा अतपावसाने शेतातच सडला. त्यामुळे नवीन कांदाच बाजारात येत नसल्याने आवक प्रचंड प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत कांदा साठवला होता. तो सध्या बाजारात येत आहे. तर नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. तोपर्यंत कांद्याचे दर वाढतच राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.मागील वर्षी याच महिन्यात ४ ते ५ हजार कांदा पिशव्यांची आवक होत होती. मात्र, सध्या मागील महिन्यापासून ७०० ते ८०० पिशव्यांच्या वर आवक जाताना दिसून येत नाही. आवक घटून मागणी वाढल्याने काही तासांतच सर्व कांदा पुणे, मुंबई व इतर राज्यात विकला जात आहे.
सध्या कांद्याच्या बाजारात आवक नसल्याने आवारात काम करणारे माथाडी कामगार, कांद्याची प्रतवारी करून पोती भरणाºया शेकडो महिलांच्याही रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान, बाजारात किरकोळ विक्रीच्या कांद्याला १२० रुपये दर मिळत आहेत. कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. तर हॉटेल आणि उपहारगृहात कांद्याचा काटकसरीने वापर केला जात आहे. अनेक ठिकाणी कांद्यासाठी वेळे पैसे आकारले जात आहे. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
किरकोळ १५० रुपये किलो...घाऊक बाजारात कांद्याने क्विंटलला दहा हजारचा टप्पा ओलांडल्याने किरकोळ बाजारात हाच कांदा १५० रुपये किलोने विकला जात आहे. सध्या कांद्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात नवीन कांदा बाजारात दाखल होतो. मात्र, यावेळी पडलेल्या परतीच्या पावसात हातातोंडाशी आलेल्या कांद्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बाजारात आवक घटली आहे. आता नवीन कांदा बाजारात दाखल होत नाही तोपर्यंत दर वाढतच राहतील.-विठ्ठल सपकाळ, सचिव बाजार समिती, लोणंद