शेखर जाधव /वडूज पोटाची खळगी भरताना... कायम दुष्काळी भागात राहणाऱ्या लोकांकडून भलेही निसर्गाच्या अवकृपेमुळे दुष्काळ जाणवत असला तरी बुद्धीचा व जिद्दीचा सुकाळ आहे, हे पुन्हा एकदा बारा वर्षीय तन्वी अंबिके हिच्या रायफल शूटिंग स्पर्धेतील गरुड भरारीने देशाला दाखवून दिले आहे. खटाव तालुक्यातील गणेशवाडी (वडूज) येथील अतुल अंबिके व पत्नी धनश्री यांना स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना नाकीनऊ येत होते. अतुल अंबिके यांच्याकडे गणेशवाडी येथील गणपती मंदिराची पूजाअर्चा वारसाने चालून आली. तर त्यांची पत्नी धनश्री या त्रिमली, ता. खटाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुली, एक मुलगा असून, कसाबसा प्रपंच चालवित मुलांना शिक्षण देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र स्पर्धेच्या युगात वावरताना त्यांना या सर्व बाबींचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. एक मुलगी दहावीला तर तन्वी सहावीला आणि मुलगा तिसरीला आहे. तन्वीचा लहानपणापासूनच एक वेगळा ठसा उमटविण्याचा प्रयत्न दिसून आला. सातारा तालुक्यातील पाल हे गाव तन्वीचे आजोळ. त्यामुळे दरवर्षी या यात्रेत ती कुटुंबासमवेत यात्रेला असायची. यात्रेत असणाऱ्या स्टॉलवर शूटिंग करण्याची तिला मोठी हौस होती. ही हौस तिचे ध्येय बनेल, हे तिच्या व कुटुंबीयांच्या ध्यानी, मनीसुद्धा नव्हते. त्यातूनच तिने मार्ग काढण्यास प्रारंभ केला. वडिलांसमोर उलट्या उड्या घेऊन वडिलांचे लक्ष केंद्रित करून घेत होती. थोडीशी चंचल स्वभावाच्या तन्वीने वडिलांकडून खेळण्यातील खटक्याची लाकडी बंदूक घेतली. तिचा हट्ट व जिद्द पाहून वडिलांनी तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. त्या लाकडी बंदुकीमध्ये कडधान्यातील मूग बंदुकीत भरून सराव करण्यास तन्वीने प्रारंभ केला. अंबिके दाम्पत्यांनी मुलीच्या निशाणीबाजीतील प्रयत्न लक्षात घेऊन तिला प्रेरणा दिली. तिला सरावासाठी लागणारे टार्गेटची कागदस्वरूप छायांकित प्रत भिंतीवर लावून दिली. शेळ्या-मेंढ्यांचा असणारा गोठा हेच तन्वीचे प्रात्यक्षिकेचे दालन ठरले. रायफल शूटिंग गर्ल्स गेम्स २०१४ या स्पर्धेत सांघिक कामगिरी बरोबरीने तन्वीने केलेली निशाणीबाजीतील यशाने ‘चॅम्पियन आॅफ चॅम्पियन्स’ ट्रॉफी महाराष्ट्राच्या संघाला प्रदान करण्यात आली. तन्वीला वैयक्तिक आणि महाराष्ट्र संघाने सांघिक काम केल्याबद्दल द्रोणाचार्य आणि पद्मभूषण सत्पाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान कण्यात आला.
पुजाऱ्याच्या मुलीची रायफल शूटिंगमध्ये गरुडभरारी
By admin | Published: January 03, 2016 12:47 AM