ओगलेवाडी : ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथील औद्योगिक वसाहत परिसरात बेकायदेशीररित्या रिक्षा व अन्य वाहनांत गॅस भरण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अपघात होऊन या परिसरातील रहिवाशांच्या जीवितास धोका होऊ शकतो. बेकायदेशीर गॅस भरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
याबाबत तहसील कार्यालय, शहर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. यावेळी रोहित कुंभार, अमोल कुंभार, मृगेश नायडू, संकेत घाडगे, स्वप्निल घाडगे, अक्षय पोटे, राहुल कुंभार, सूरज खवळे व रहिवासी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, ओगलेवाडी, विरवडे एमआयडीसी परिसरात अनेक दिवसांपासून रिक्षा व अन्य वाहनांत बेकायदेशीररित्या व धोकादायक पद्धतीने गॅस भरण्याचे काम सुरू आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही यावर कारवाई झालेली नाही. लोकवस्ती व विविध प्रकारचे कारखाने असलेल्या या परिसरात अपघात झाल्यास लोकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.