सातारा : येथील केसकर काॅलनी, व्यंकटपुरा पेठेतील सुलोचना शशिकांत माने (वय ७५) यांचा गॅस गिझरचा स्फोट होऊन उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना दि. २० रोजी सकाळी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना माने यांनी दि. २० रोजी सकाळी पाणी तापविण्यासाठी गॅस गिझर सुरू केला. काही वेळातच त्यांच्या गॅस गिझरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये त्या भाजून गंभीर जखमी झाल्या. घरातल्यांनी त्यांना तातडीने साताऱ्यातील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कऱ्हाड येथे दाखल करण्यात आले. मात्र, रविवार, दि. २२ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार मालोजी चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, गॅस गिझरचा स्फोट होऊन वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली. ज्यांच्या घरात गॅस गिझर आहेत. त्यांनी या गॅस गिझरचा चांगलाच धसका घेतला आहे.
स्फोटाचे कारण शोधावे लागेल..गॅस गिझरचा नेमका स्फोट कसा झाला. अशाप्रकारची घटना साताऱ्यात पहिल्यांदाच घडली आहे. गॅस गिझर कधी खरेदी केला होता. त्याची देखभाल दुरूस्ती केली होती का, याचीही माहिती घेत असल्याचे हवालदार मालोजी चव्हाण यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.