आदर्की : फलटण तालुक्यात चार दिवसांपासून कडक लॉकडाऊन असूनही गावोगावी किराणा दुकान, पानटपऱ्या, हॉटेल आणि ढाब्यांवर सहज पेट्रोल उपलब्ध होत आहे. यामुळे दुचाकीस्वार सुसाट धावत आहेत. त्यांच्यावर कोणाचाही वचक नसल्याने आदर्की मंडळात पेट्रोलचा बाजार अन् कोरोनाने प्रशासन झाल्याचे चित्र दिसत आहे.
आदर्की महसुली मंडलात कोरोनाने कहर केला असून, गावोगावी कोरोना विलगीकरण कक्ष सुरू केले आहेत. तरीही बाधित रुग्ण कमी होत नाहीत. भरारी पथक, पोलीस प्रशासन गस्त घालत आहेत; पण गावोगावी या पेट्रोल विक्रेत्यांची संख्या वाढत आहे. किराणा दुकान, पानटपरी, हॉटेल, ढाबे, गॅरेज आदी व्यवसायाच्या ठिकाणी पेट्रोल विक्री होत आहे. ते रात्रीचे मुख्य पेट्रोल पंपावरून चारचाकी दुचाकीवरून पेट्रोल आणून बाटलीतून बिनदास्तपणे विकत आहेत.
कडक लॉकडाऊनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल दुचाकी, चारचाकीत दिले जाते. इतर वाहनांना पेट्रोल विक्री करण्यास मनाई आहे तरी सुद्धा आदर्की महसुली मंडलातील पंचवीस ते तीस किराणा दुकाो, पानटपऱ्या, हॉटेल, ढाब्यांवर ते सहज मिळत असल्याने लॉकडाऊनमध्ये फिरण्यास बंदी आहे; पण दुचाकीस्वार दुचाकीत सकाळी पेट्रोल टाकून दिवसभर गल्लीबोळांत व गावागावात मोकाट फिरत आहेत. कोणाच्याही तोंडाला मास्क नसल्याने कोरोना संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
मंडळातील बहुतांशी गावे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करून मुख्य ठिकाणी बांबू लावून रस्ते बंद केले आहेत. तसे फलक झळकत आहेत; पण पेट्रोल विक्री बिनधास्स्त सुरू आहे. त्यामुळे आदर्की महसुली मंडळात ‘पेट्रोलचा बाजार अन् प्रशासन झालेय कोरोनाने बेजार’ असे चित्र दिसत आहे.
चौकट
सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढल्याने मेडिकल, दवाखाने वगळून सर्व आस्थापना बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. त्यामध्ये खासगी
वाहनांना पेट्रोल देण्यास बंदी घातली आहे; पण आदर्की महसुली मंडळात गावागावातील मिनी पेट्रोल
पंपांवर सहज पेट्रोल मिळत असल्याने मुख्य पंपावरून रात्रीचे मिनी पेट्रोल चालंकाना पेट्रोल पंपावरील कर्मचारी पुरवठा करतात किंवा मिनी पेट्रोल पंप चालक दुचाकी, चारचाकीतून कॅनमधून पेट्रोल आणून बाटलीतून विकत असल्याची चर्चा आहे.