सातारा : खेड ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या उंबरठ्यावर असतानाच गावामध्ये काही लोकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होऊ लागला आहे. अनेकांना सलाईन लावायला लागले तर अनेक जण अद्यापही खासगी दवाखान्यांसह सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना आयते कोलित मिळाले असल्याने सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.सातारा शहराच्या पूर्वेला असणाऱ्या सुमारे सहा हजार लोकवस्तीच्या या गावात सध्या लोकांना उलट्या-जुलाबाचा त्रास होत आहे. अनेकांनी खासगी दवाखान्यांत उपचार घेतले. पाणी उकळून पिले जात आहे. सात ते आठ दिवसांपासून गावात हा प्रकार सुरु असताना ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ला माहिती मिळाल्यानंतर प्रतिनिधींनी गावात प्रत्यक्ष जाऊन लोकांशी चर्चा केली. अशोक फरांदे यांच्या दुकानासमोर काही ग्रामस्थ या साथीबाबत माहिती देताना म्हणाले की, गावात साथीचा आजार पसरला आहे. मात्र, आरोग्य विभागाचे लोक केवळ पाहणी करुन गेले. तसेच औषधांचे वाटपही केले नाही.त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक फरांदे, सविता प्रवीण निगडे, रंजना शंकर पवार, शंकर नारायण पवार, संजय कदम, माधवी संजय कदम, नंदकुमार गुलाबराव यादव, विशाल नंदकुमार यादव, मंदाकिनी नंदकुमार यादव, जयश्री गुलाबराव निकम, दत्तात्रय निकम, मंगल मांडवे आदी १0 ते १५ जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. यापैकी आणखी काही जण अजूनही उपचार घेत आहेत. या उपचारांवर पैसे खर्च झाले. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच भीमराव लोखंडे यांनी पाणी दूषित असल्याच्या आरोपाचे खंडण केले आहे. ग्रामपंचायतीच्या पाण्याची तपासणी करण्यात आली असून ते शुध्द आहे. साथ यायची असती तर ती संपूर्ण गावात यायला पाहिजे होती, ती केवळ एका आळीत आली आहे, असे ‘लोकमत’ शी बोलताना त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
खेडच्या मैदानात ‘गॅस्ट्रो’चा ताप!
By admin | Published: June 12, 2015 9:49 PM