चाफळ : गमेवाडी येथील उत्तरमांड धरणावर एकत्र जमत धरणग्रस्तांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या १०० टक्के पाणी अडवण्याच्या धोरणाचा गुरुवारी तीव्र शब्दात निषेध नोंदवला. तत्पूर्वी ‘लोकमत’ने १७ सप्टेंबरच्या अंकात धरणग्रस्तांची व्यथा मांडत लोकप्रतिनिधी व धरणग्रस्त संघटनेच्या नेत्यांनी धरणग्रस्तांकडे पाठ फिरवल्यावर प्रकाश झोत टाकला होता. या दोन्हीं घटनांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दखल घेत अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली होती. यात धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावल्यासंदर्भात व पाणी साठा न करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
गमेवाडी येथे उत्तरमांड नदीवर नाणेगाव बुद्रूक, माथणेवाडी गावांच्या सरहद्दीवर उत्तरमांड धरण उभारण्यात आले आहे. धरणग्रस्तांचा विरोध असतानाही बुधवारी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरमांड धरणाचे तीन वक्र दरवाजे बंद करत धरणात १०० टक्के पाणी साठा करण्याचा प्रयत्न केला होता. उत्तरमांड प्रकल्पग्रस्तांना देय असणाऱ्या जमिनी, गावठाणातील नागरी सोईसुविधा अपूर्ण असताना अधिकाऱ्यांनी १०० टक्के पाणीसाठा करण्याचा अट्टाहास धरल्याने धरणग्रस्त संतप्त झाले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी संतप्त धरणग्रस्त उत्तरमांड धरणावर एकत्र जमले व त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला.
दरम्यान, ‘लोकमत’ने धरणग्रस्तांची व्यथा मांडत लोकप्रतिनिधी व धरणग्रस्त संघटनेच्या नेत्यांनी धरणग्रस्तांकडे पाठ फिरवल्यावर प्रकाश टाकला. या दोन्ही घटनांची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दखल घेत अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली होती. यात धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात व पाणीसाठा न करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच रविवारी दरवाजे उचलून अडवलेले पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.
चौकट
जमिनी वाटप अपूर्ण
जाळगेवाडी येथील ३५ खातेदारांना ऐच्छिक रकमा मिळालेल्या नाहीत. तसेच २४ खातेदारांना पुनर्वसन ऐच्छिक रकमा मिळालेल्या नाहीत. आठ ते नऊ लोकांना जमिनी मिळालेल्या नाहीत. माथणेवाडी येथील २२पैकी काही खातेदारांना भूखंड मिळाले नाहीत. काहींना जमीन आदेश आहेत, परंतु प्रत्यक्षात जमिनीचा ताबा मिळालेला नाही. ४४ पैकी २२ लोकांचे खास बाबचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
कोट
दरवाजे बंद केल्याने नुकसान
उत्तरमांड धरणात १०० टक्के पाणीसाठा केल्यास चाळीस खातेदारांच्या शेतात पाणी शिरून उभ्या शेत पिकांचे नुकसान होणार आहे. बुधवारी धरणास दरवाजे बसवल्याने बाबूराव पवार यांच्या ऊस पिकात पाणी शिरले आहे. १४ विद्युत पंपापैकी ८ विद्युतपंप पाण्याखाली गेले आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न नाणेगाव बुद्रूकचे विद्यमान सरपंच नितीन मसुगडे यांनी उपस्थित करत नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
फोटो २०उत्तरमांड धरण
उत्तरमांड धरणाचे दरवाजे उघडून पाणी सांडव्याद्वारे नदीपात्रात सोडण्यात आले. (छाया : हणमंत यादव)