शेखर जाधव -वडूज --आयुष्य हे सुख आणि दु:ख यांच्या धाग्यांनी विणलेले. तसंच आहे, असे म्हणतात; पण ते तेवढंच खरं नाही. त्यात आशा आणि निराशा, यश आणि अपयश, मान आणि अपमान, पडझड आणि उठाव आदी जगण्याच्या नानाविध कळांचेही धागे गुंफले आहेत. आपण ते सारे अनुभवतही असतो. एक मात्र खरे, आतील अपयशाचे क्षण माणसांना काही काळच थोपवू शकतात, ते जीवनाला कायमचे अडवून धरू शकत नाहीत. दु:ख हे जीवनातील सत्य असले तरी आनंद हे त्याहून मोठे महासत्य आहे आणि त्याच्याच दिशेने कैकाडी समाजातील असूनही बुरड समाजाचा व्यवसाय सांभाळत मुला-मुलींच्या प्रपंचाला हातभार लावत ८० वर्षांच्या वैजयंता नामदेव माने यांच्या जीवनाचा प्रवास सुरू आहे.माण तालुक्यातील दहिवडी माहेर असणाऱ्या वैजयंता माने यांचे सासर वडूज जरी असले तरी या दोन्ही खटाव-माण तालुक्यांत कळक(बांबू), करंजाच्या फोकापासून विविध वस्तू तयार करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. पती नामदेव माने यांच्या अचानक देवज्ञाने प्रपंचाची सर्व जबाबदारी आपसुकच त्यांच्यावर पडली. पाच मुले व चार मुली यांचे संगोपन करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. प्रारंभी हा व्यवसाय करताना करंजाच्या फोका गोळा करून मोठे हारे, डालगे तयार करीत व ते विकण्यासाठी त्यांनी तालुक्यातील प्रत्येक खेड्यात पायपीट केली. त्याकाळी पैशापेक्षा धान्याची गरज त्यांना जादा असल्यामुळे काही शेतकऱ्यांना हा तयार माल देऊन त्यांच्यापासून धान्य गोळा करीत. त्यातूनच त्यांनी या नऊ अपत्यांचा सांभाळ केला. घरालगतच जिल्हा परिषद मराठी शाळा असल्याने त्यांनी मुला-मुलींना शाळेचे प्राथमिक धडे घेण्यासाठी धाडले. कारण घराजवळच हायस्कूल व मराठी शाळेत जाणारी इतरांची मुले-मुली पाहून आपलीपण मुले शिकली पाहिजेत. असा त्यांचा आग्रह होता; परंतु हा प्रपंच चालविताना त्यांना या व्यवसायात मुला-मुलींची फार मोठी मदत होऊ लागली. त्यामुळे त्यांची शिक्षणेही अर्धवट अवस्थेत राहिली.मुले-मुली मोठे झाल्यावर त्यांचे हात पिवळे करण्यासाठी वैजयंता यांची धावपळ फारच झाली. प्राप्त परिस्थितीवर मात करीत त्यांनी मुलांची लग्ने करून दिली. आज त्यांचा सुना, नातवंडे व परतुंडे यांचा गोतावळा पाहता त्यांनी आता आराम करावा, अशी अपेक्षा कुटुंबातील प्रत्येकाची आहे. कारण, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे आजीने उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगावे, अशी नातवांची इच्छा आहे. मात्र, आपले हात-पाय हालतायत तोपर्यंत आपण हा व्यवसाय सुरूच ठेवणार, या मताशी ठाम आहेत. करंजाच्या फोकापासून सुरू केलेला व्यवसाय आता बांबू, कळक यापासून शिडी, टोपली, दुरडी, करंडे, केरसुणी, पाटी अशा वस्तू हाताने बनवून घराजवळच दुकान थाटले आहे. तालुक्यातील शेतकरी मंडळीसह नोकरदार, व्यावसायिक हे येथूनच लागणारे साहित्य खरेदी करून वैजयंता माने यांच्या या वयातील काबाडकष्टाचे कौतुक करतात.
धान्य गोळा करून नऊ अपत्यांचा आजी करतेय सांभाळ
By admin | Published: September 30, 2015 10:10 PM