फलटण : १९५९ मध्ये स्थापन केलेल्या श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण येथील सेवानिवृत्त सेवकांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. संस्थेतील माजी शिक्षक आणि महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी संस्थेमध्ये कार्यरत असताना आलेल्या अनुभवांची शिदोरी उपस्थितांसमोर ठेवली व जुन्या आठवणींना उजाळा दिला.
संस्थेचे ऑनररी सेक्रेटरी तथा फलटणचे नगरसेवक डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी सेवानिवृत्त शिक्षकांच्या योगदानाबद्दल आपुलकीची भावना व्यक्त केली. यापुढेही संस्थेचा शैक्षणिक इतिहास समाजासमोर येण्यासाठी संस्थेला सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्व सेवनिवृतांशी आपुलकीने व्यक्तिगत संवाद साधत त्यांची व कुटुंबाची विचारपूस केली.
सेवानिवृत्त शिक्षकांपैकी एम. पी. कुंभार, डी. ए. बनकर, एच. के. लोणकर, एल. डी. पवार यांनीही आपल्या मनोगतातून कार्यरत असताना आलेल्या अनुभवांच्या आठवणींना उजाळा देत संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने संस्थेच्या सर्व शाखांनी संस्थेच्या तेजस्वी इतिहासाची साक्ष देणारे, जुन्या आठवणींना उजाळा देणारे दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी आकस्मित निधन झालेल्या आजी माजी सेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष बी. एम. मोदी, नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी बेडके, सी. एल. पवार, शिवाजीराव बेडके, श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. सचिन बेडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एस. एन. राऊत यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात स्नेहमेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला.
फोटो : ०९ फलटण
फलटणमध्ये आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यात डॉ. सचिन बेडके, रवींद्र बेडकिहाळ, बापूसाहेब मोदी आदी मान्यवर उपस्थित होते.