सणबूर : गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक पठार परिसरातील शिद्रुकवाडी रस्त्यावर दहा ते बारा गव्यांचा कळप सकाळ - संध्याकाळी फिरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ढेबेवाडी - नवास्ता मार्गावरील शिद्रुकवाडी फाट्यातून गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गव्यांचे कळप रस्त्यावरच उभे असल्याने रस्त्याने दररोज ये-जा करणारे शिद्रुकवाडी येथील राजाराम म्होप्रेकर यांना धडकी भरली. त्यांनी दुचाकी जागेवरच उभी केली. थोड्या वेळाने गव्यांचा कळप टेळेवाडी गावच्या दिशेने गेला. सध्या डोंगर पूर्णपणे रिकामे झाल्याने वन्यप्राणी डोंगरातून गावाच्या दिशेने येत आहेत. चार दिवसांपूर्वी बोरगेवाडी - सळवे येथील शेतकऱ्याची गाय गव्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे जनावरे चरायला घेऊन जाणाऱ्या लोकांमध्ये घबराट पसरली आहे. परिसरातील भराडीचा माळ नावाच्या शिवारात हे गव्यांचे कळप सतत फिरताना लोकांना दिसत आहेत. त्यामुळे जनावरे चारायला जाणाऱ्या लोकांना जनावरे सोडणे कठीण होऊन बसले आहे. गव्यांचे कळप बहुले, टेळेवाडी, मारुलहवेली गावाच्या डोंगराच्या दिशेने शिद्रुकवाडीकडे येत आहेत. ते रस्त्यातच थांबत असल्याने लोकांची घाबरगुंडी उडत आहे. या गव्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.डोंगर कपारीत विखुरलेल्या आणि जंगलाने वेढलेल्या या परिसरात शिद्रुकवाडी या तीन वस्त्या लागून आहेत. येथे वन्यप्राण्यांचा सतत वावर आहे. या प्राण्यांकडून पिकांचे, पाळीव जनावरांचे नुकसान होत आहे. वर्षागणिक गव्यांचा उपद्रव वाढत चालल्याने शेती आणि शेतकरी अडचणीत आले आहेत. भात, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड यासह खरीप व रब्बी हंगामातील विविध पिके शेतकरी घेतात. मात्र, गव्यांच्या उपद्रवामुळे शेतातील पीक कापणी व मळणी होऊन घरापर्यंत येईलच, याचीही शाश्वती आता उरलेली नाही.
शिद्रुकवाडी परिसरात गव्यांचे कळप रस्त्यात मध्येच उभे राहत असल्यामुळे या मार्गावरून ये-जा करताना भीती वाटत आहे. अगोदरच डुकरे व वानरे आणि बिबट्यामुळे लोक त्रासलेले असताना आता त्यात गव्यांची भर पडली आहे. -राजाराम म्होप्रेकर, ग्रामस्थ, शिद्रुकवाडी