सातारा : सध्या कोरोनाचा धकाधकीचा काळ असल्यामुळे शेतकऱ्यांनाही बाजारपेठेमधून वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे मग शेतकरी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करीत आहेत. यापैकीच म्हणजे शेतातील बुजगावणे.
शेतामध्ये पक्ष्यांपासून राखण करण्यासाठी शेतकरी बुजगावणे उभे करतात. या बुजगावण्यामुळे पक्षी शेतात येत नाहीत. परिणामी शेतातील येणाऱ्या धान्याची नासाडी टळते. यापूर्वी अनेक जण शेतामध्ये बुजगावणे म्हणून घरातील मडकी उभे करून त्यावर शर्ट घालत होते. त्या मडक्यावर खडूने मोठे डोळे आणि मिशा काढून कोणी माणूस आहे, असे भासवीत होते. मात्र, आता यावरही मात करीत पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी गणपतीमध्ये गौराई येत असते. या गौराईचा आता बुजगावणे म्हणून शेतकऱ्यांनी खुबीने वापर केला आहे. दर तीन वर्षांनी गौराई विसर्जित केली जाते. मात्र, काही शेतकऱ्यांनी गौराईचे विसर्जन न करता त्याचा वापर बुजगावण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे.
गौराईचे बुजगावणे शेतात उभे केल्यामुळे एखादी महिला शेतात उभी असल्यासारखे लांबून चित्र पाहायला मिळते. सध्या उन्हाळी पिकांमध्ये हे बुजगावणे पाहून माणूसही फसेल इतके हुबेहूब चित्र महिलेचे डोळ्यासमोर दिसून येते, तर पक्षी, प्राणीसुद्धा या बुजगावण्याला चांगलेच धास्तावल्याचे पाहायला मिळत असल्याचे तेथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सुरुवातीला एका शेतकऱ्याने या गौराईच्या बुजगावण्याचा प्रयोग केला. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील, तसेच गावातील शेतकऱ्यांनी गौराईचे बुजगावणे शेतात उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी सांगतायत, काठीला मडकं बांधून शेतात बुजगावणे उभे करण्यापेक्षा गौराईचे बुजगावणं पक्ष्यांना हुलकावणी देत आहे. एखादी हुबेहूब महिला या ठिकाणी उभी असल्याचे दिसल्यामुळे पक्षी शेतातील पिकावर येत नाहीत. गौराईचा अशाप्रकारे चांगल्या पद्धतीने गावकऱ्यांनी शेतातील बुजगावण्यासाठी वापर केल्याने पाटण तालुक्यात सध्या हा विषय चर्चेचा आणि उत्सुकतेचा ठरला आहे.
चौकट : कोणी गौराई देता का गौराई!
गौराईचे बुजगावणं शेतामध्ये शेताची मालकीण स्वतःच्या पिकाचे राखण करीत असल्याचे भासत आहे. त्यामुळे सध्या गौराईला चांगलीच मागणी वाढली आहे; परंतु सध्या कोरोनाच्या धामधुमीत बाजारपेठाही बंद आहेत. त्यामुळे गौराई कोठे मिळत नाही. अनेक शेतकरी गौराई देता का गौराई, अशी आर्त हाक देत आजूबाजूच्या गावांमध्ये फिरत आहेत. इथून पुढे भविष्यात गौराईचे विसर्जन न करता या गौराईचा बुजगावणे म्हणून सर्वच शेतकरी वापर करतील, असेही अनेक शेतकऱ्यांचे मत आहे.