कराड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना येत्या शुक्रवारी (दि.२५) कराड दौऱ्यात दलित महासंघाच्यावतीने घेराव घालण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महासंघाच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.पत्रकात म्हटले आहे की, 'गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करण्यात यावीत तसेच २०२२ पर्यंतची गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करण्यात यावीत, या मागणीसाठी घेराव घालण्यात येणार असल्याचे दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी म्हटले आहे.या आंदोलनामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. मच्छिंद्र सकटे यांचेसह अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत. याचबरोबर सर्व आर्थिक विकास महामंडळाची कर्जमाफी करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येणार आहे. हे घेराओ आंदोलन यशस्वी करण्यासाठी दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, उपाध्यक्ष सुरज घोलप, खटाव तालुका प्रभारी शंकर तुपे, कराड तालुका अध्यक्ष जयवंत सकटे, सुहास पिसाळ, सुर्यकांत काळे आदी परिश्रम घेत आहेत.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने गायरान अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. गेली ३०-४० वर्षे डोक्यावर असणारे छप्पर काढून घेण्याच्या नोटिसा काही ठिकाणी मिळाल्याने ग्रामीण भागात कमालीची अस्वस्थता वाढली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली असली तरी त्याला स्थगिती मिळविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.