सातारा : असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार आणि घराघरात असणाऱ्या गृहिणी या सर्वांना अधिकार आणि सुरक्षितता देण्यासाठी नव्या सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पात लिंगसमभाव अधोरेखित करणाऱ्या तरतुदी कराव्यात अशी महिलांची अपेक्षा आहे. गृहिणी म्हणून घरातच असणाऱ्या महिलेलाही गृहिणी भत्ता सुरू करून तिच्या कामाचा मोबदला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना अजूनही कामाच्या ठिकाणी सुरक्षितता पुरववावी. त्याचबरोबर हयात असताना आरोग्याची हमी असणारा आरोग्य विमा देण्यात यावा. कामगार महिलांची मोजदाद करून त्यांच्या आरोग्य आणि अर्थविषयक जागृती दाखविणे आवश्यक आहे. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घर सोडून बाहेर राहणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित वसतिगृह असणे आवश्यक आहे. निमशहरी भागामंध्ये महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी त्यांचा वावर सुरक्षित करण्यासाठी त्यांना कमी व्याजदराने दुचाकी खरेदीसाठी कर्जपुरवठा करण्यात यावा. महिलांच्या नावाने घर करण्याच्या प्रस्तावावर अंमलबजावणी करून महिलांना हक्काचा निवारा देण्यासाठीही या अर्थसंकल्पात तरतूद होणे आवश्यक आहे, अशी या क्षेत्रात काम करणाऱ्यांची अपेक्षा आहे.‘जेंडर बजेटिंग’ची संकल्पना स्वीकारावी, अशीही अपेक्षा जाणकार महिलांनी व्यक्त केली. जगातील लहानात लहान देशही आज ‘जेंडर बजेटिंग’ स्वीकारून सर्वच विभागांत पुरुष आणि महिलांना समान प्रतिनिधीत्व, संधी आणि निधी मिळेल, याची तरतूद करतात. आपल्याकडे असे एकही बजेट झाले नाही. नव्या सरकारकडून तशी अपेक्षा असल्याचे अनेकांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
आर्थिक धोरणातून लिंगसमभाव प्रकट व्हावा
By admin | Published: July 04, 2014 11:22 PM