पाचगणी : पुस्तकांचे गाव भिलार २८ वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (दि. १८) प्रारंभ होत आहे. या संमेलनाची सर्व तयारी झाली असून, मुलांसह बाल साहित्यिक, विचारवंत, रसिकांच्या स्वागतासाठी पुस्तकांचे गाव भिलार सज्ज झाले आहे. सकाळी ग्रंथदिंडीने या संमेलनाला सुरुवात होणार आहे. संमेलननगरीसह स्ट्रॉबेरी आणि मलबेरीने बहरलेली झाडे, पुस्तकांची घरे देखील रसिकांच्या स्वागतासाठी आतूर झाली आहेत.
बालसाहित्य नगरीला पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले आहे. तर मुख्य सभामांडवाला यशवंतराव चव्हाणांचे नाव देण्यात आले आहे. भिलार परिसरात संपूर्ण मार्गावर स्वागत करणाºया कमानी उभारल्या आहेत. पाचगणीपासून ठिकठिकाणी मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत. रंगीबेरंगी फुलांनी ग्रंथदिंडीतील पालखी सजविण्यात आली आहे. भव्य सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे. संमेलनाच्या शेजारीच खास निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थी तसेच शिक्षकांच्या कार्यशाळेची तयारी करण्यात आली आहे.
ग्रंथदिंडी पार पडल्यानंतर ज्येष्ठ लेखिका माधुरी पुरंदरे यांची मुलाखत पार पडणार आहे. लेखन कार्यशाळेचे समन्वयक म्हणून किरण केंद्रे काम पाहणार आहेत. स्वागताध्यक्ष बाळासाहेब भिलारे, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे सहकार्यवाहक सुनील महाजन, संमेलन समन्वयक शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष माधव राजगुरू, निमंत्रक प्रवीण भिलारे, सरपंच वंदना भिलारे, किरण केंद्रे यांनी संमेलनस्थळाला भेट देऊन आढावा घेतला.विनोद तावडे साधणार मुलांशी संवाद...ज्येष्ठ बालसाहित्य डॉ. अनिल अवचट यांच्या अध्यक्षतेखाली (शनिवारी) संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर डॉ. जयंत नारळीकर, मंगला नारळीकर हे ‘विज्ञान, गणित आणि अवकाश’ या विषयावर मुलांशी संवाद साधणार आहेत. दुपारच्या सत्रात सांस्कृतिक व भाषा मंत्री विनोद तावडे हे संमेलनात सहभागी होऊन मुलांशी संवाद साधणार आहेत.ग्रंथदिंडीतून घडणार संस्कृतीचे दर्शनसंमेलनाला ग्रंथदिंडीने प्रारंभ होत आहे. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि सातारा परिसरातील शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. हे विद्यार्थी संत, थोर व्यक्ती, ऐतिहासिक व्यक्तींचे वेश परिधान करून सहभागी होणार आहेत. त्यात ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, भिलार ग्रामस्थ, राज्यभरातील बाल साहित्यिक, विचारवंत, रसिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे या ग्रंथदिंडीतून संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.