वाई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व शहर विकास कामांसंदर्भात बोलावण्यात आलेली वाई पालिकेची ऑनलाईन सभा सत्ताधारी व विरोधकांतील योग्य समन्वयाअभावी पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षांकडून तहकूब करण्यात आली. कोरोना प्रतिबंधासाठी सभेत चर्चा होणे अपेक्षित असताना, तसे न झाल्याने उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांच्यासह सदस्य उपस्थित होते. सभेला सुरुवात होताच मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. यावेळी दि. २६ मार्च रोजी सभा झालीच नाही तर त्याचे इतिवृत्त कसे मांडणार? असा प्रश्न उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी उपस्थित केला. यावेळी नगराध्यक्षांनी मागील सभेमध्ये सर्वानुमते चर्चा झाली आहे आणि जे विषय मंजूर करायचे होते ते मंजूर केलेले आहेत. जे नामंजूर करायचे होते ते सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत नामंजूर केले आहेत असे सांगितले.
यावेळी मला न विचारता विषय कसे मंजूर केले असे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी विचारले. झालेल्या सभेबाबत शंका उपस्थित करण्यात आल्याने नगराध्यक्षा तथा पीठासन अधिकारी डॉ. प्रतिभा शिंदे यांनी दि. २६ मार्च व मंगळवारी बोलविण्यात आलेली सभा या दोन्ही सभा स्वत:च्या अधिकारामध्ये तहकूब करत असल्याचे सांगितले. त्यांनी ऑनलाईन सभेतून सभात्याग केला. सभा तहकूब झाल्याने उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तहकूब झालेली सभा पुन्हा घेण्यास नगराध्यक्षांनी नकार दिला.
शहरातील कोरोना प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत डॉक्टर असणाऱ्या नगराध्यक्षांना कोणतेही गांभीर्य नाही. त्यातही या सभेबाबत नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाकडून योग्य तो खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी मागावा अन्यथा नगराध्यक्षा व प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात पालिका कार्यालयास टाळे ठोकले जाईल, असा इशारा तीर्थक्षेत्र आघाडीचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी दिला.
(चौकट)
दि. २६ मार्च रोजी झालेल्या सभेतील निर्णयावर उपनगराध्यक्ष व सन्माननीय सदस्य समाधानी नाहीत. या सभेबाबत प्राधिकृत अधिकारी तथा सक्षम प्रशासकीय अधिकाऱ्याकडून कायदेशीर सल्ला घेण्यात येईल. त्यामुळेच मंगळवारी बोलविण्यात आलेली पालिकेची सभा देखील तहकूब करण्यात आली. दि. २९ एप्रिल रोजी पुन्हा सभा घेण्यात येईल.
- डॉ. प्रतिभा शिंदे, नगराध्यक्षा