पिंपोडे बुद्रुक : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या विदारक परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले असताना दिवसागणिक वाढत जाणाऱ्या इंधन दरवाडीच्या भडक्यात सामान्य जनता होरपळून निघत आहे. दि. २ जुलैपासून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये सुमारे २६ रुपये वाढ होऊन त्याची विक्री किंमत आता ८४० रुपयांवर गेली आहे. पेट्रोलने तर शंभरी ओलांडली असून, डिझेलही शंभरी ओलांडण्यापासून अवघे चार रुपये दूर आहे. या वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्यांची चिंता वाढली असून, नुकतीच गॅस कंपनीने दरवाढ केल्याने एप्रिलमध्ये ८१४ रुपयांना मिळणाऱ्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ८४० रुपये इतकी झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे दरदेखील भरमसाठ वाढले आहेत. सद्यस्थितीत पेट्रोल १०५ रुपये तर डिझेल सुमारे ९५.६० रुपये प्रतिलीटर दराने विकले जात आहे. त्यामुळे माल वाहतुकीत मोठी भाडेवाढ झाली असून, यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भावही भडकत आहेत.
दरम्यान, मागील सहा महिन्यांत घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची किंमत सुमारे १४०.५० रुपयांनी वाढली आहे. दरवाढीचा हा आलेख असाच राहिला तर सर्वसामान्यांना पुढील काही महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरसाठी एक हजार रूपये मोजावे लागतील की काय, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.