सातारा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाने उपाययोजना राबविल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीस शासकीय ग्रामीण रुग्णालयात पीएसए ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येणार आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ऑक्सिजन पुरवठा सुरळीत चालण्यासाठी स्वनियंत्रित विद्युत जनित्राची गरज भासते. साताऱ्यातील कूपर उद्योग समूहाने अवघ्या एक रुपया भाडेतत्त्वावर तेरा रुग्णालयांसाठी स्वनियंत्रित विद्युत जनित्र दिले आहेत.
सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका बसला आहे. मोठ्या संख्येने बाधित निघाले असून अनेकांचा मृत्यूही झाला आहे. आता तिसरी लाट येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वीस ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसविण्यात येत आहेत. वीज गेल्यास त्यांना जनरेटरची गरज भासणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कूपर उद्योग समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक फरोख कूपर यांना जिल्ह्यातील तेरा ग्रामीण रुग्णालयांसाठी शंभर व १६० केव्हीए रेटिंगचे डिझेल जनरेटर देण्याची विनंती केली होती. त्यानुसार फरोख कूपर यांनी नाममात्र एक रुपया भाडेतत्त्वावर लाखो रुपयांचा जनसेट वापरण्यास संमती दिली आहे.
या प्रकल्पांतर्गत कूपर उद्योग समूह फलटणचे उपजिल्हा रुग्णालय, कोरेगाव, काशिळ, मेढा, दहिवडी, वडूज, औंध, सोमर्डी, उंडाळे, गोंदवले, पिंपोडे, कलेढोण व पुसेगाव येथील ग्रामीण रुग्णालयांसाठी कूपर ब्रॅण्डचे नामांकित विद्युत जनित्रे उभारणीस सुरुवात केली आहे. काशिळ येथे १६० केव्हीए विद्युत संच व ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आले. मेढा, कोरेगाव, फलटण व कलेढोण येथे जनसेट रुग्णालयस्थळी पोहोचले आहेत. ते उभारण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व विद्युत जनित्रे कार्यान्वित होऊ शकतात. अवघ्या एक रुपया भाडेतत्त्वावर जनरेटरच्या करारावर गेल्या आठवड्यात शासनाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण व कूपर उद्योगाचे सर्वेसर्वा फरोख कूपर यांनी स्वाक्षरी केल्या.
प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांचे सहकार्य लाभले. तर बांधकाम विभागाचे अभियंता एम. आर. शिंदे, नितीन शिंदे, पी. एस. शिवदास यांचा मोलाचा वाटा आहे.
चौकट
देखभालही करणार
जिल्हा शासकीय रुग्णालयाला केवळ विद्युत संचाचा पुरवठा करून कूपर उद्योग समूह शांत न बसता त्याच्या वापराच्या कालावधीत देखभालही स्वखर्चाने करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन क्षमता वाढल्याने कोरोनाविरोधातील लढ्याला बळ मिळणार आहे.