आॅनलाईन लोकमतकापडगाव : मराठी नववषार्चा पहिला दिवस म्हणजे चैत्री पाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी संकल्पाची, मांगल्याची, समृद्धीची, नवचैतन्याची गुढी उभारली जाते. या गुढीला साखरेचा हार म्हणजेच साखरेपासून तयार केलेल्या गाठी घालण्याची परंपरा आहे. लोणंदमधील काही मिठाई व्यावसायिक सध्या या गाठी बनविण्याच्या कामात व्यस्त आहेत.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत गाठी बनवणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. कारण कारखान्यामधून मशीनवर बनवलेल्या गाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने लाकडी साच्यामध्ये बनवलेल्या गाठी आकर्षक असतात. सध्या साखरेच्या दरात वाढ झाल्याने गाठीचे दरही किलोमागे १० ते १५ रुपयांनी वाढलेले आहेत.
बाजारात या साखरेच्या गाठी उपलब्ध झाल्या असून, नवीन वर्षाच्या नव्या संकल्पना साकारण्यासाठी साखरेची गाठी बांधून गुढी उभारण्यासाठी गाठी खरेदी करण्यासाठी लोणंदमध्ये गर्दी होत आहे.गाठी बनविण्यासाठी प्रथम साखरेचा पाक तयार केला जातो. हा पाक घोटवून ज्या साईजमध्ये गाठी बनवायची आहे, त्या लाकडी साच्यामध्ये हा पाक ओतला जातो. वेगवेगळ्या साईजमध्ये व वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या वजनाच्या गाठी बनविण्यासाठी अनेक लाकडी साच्यांचा उपयोग केला जातो. १०० किलो साखरेमध्ये अंदाजे ९५ किलो गाठी तयार होतात. - बाळू पवार, आचारी