कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून, रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच वाढलेली बेसुमार झाडेझुडपे, घाणीचे साम्राज्य रस्त्यावरील मोठे खड्डे, वाहन पार्किंगसाठी जागेचा अभाव, आदी गंभीर समस्यांमुळे वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत.
उड्डाणपुलाची मागणी
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाण पूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पुणे-बंगलोर आशियाई महामार्गालगत कोल्हापूर नाका येथे वारंवार अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या लेनवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे.
फूटपाथची दुरवस्था
कऱ्हाड : शहरातील दत्तचौक ते कृष्णा नाका या मार्गादरम्यान रस्त्याकडेला असणाऱ्या पादचारी मार्गाची दुरवस्था झाली आहे. या पादचारी मार्गावर ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या फरशा फुटल्या आहेत. त्यामुळे खड्डे निर्माण झाले असून, पादचाऱ्यांना यावरून प्रवास करताना धोका निर्माण होत आहे. पादचारी मार्गाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.
चौपदरीकरण गतीने
कऱ्हाड : कऱ्हाड ते पाटण रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. ठिकठिकाणी जोड रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दुभाजक उभारले जात आहेत. काही ठिकाणी एका लेनचे काम अद्याप बाकी आहे. ते कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत.