उंब्रज : ‘आम्ही शेतकरी असल्यामुळे शेतकऱ्यांचा विषय आमच्या जिवाभावाचा आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकरी काय मागत आहे, हे एकदा समजून घ्यावे. आमच्यासाठी काय चांगलं किंवा काय वाईट आहे, ते आम्हाला नीट कळतं; परंतु मोदी सरकारला का कळत नाही? वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजप सरकारला हाकलून लावा,’ असे आवाहन सत्त्वशीला चव्हाण यांनी केले.
उंब्रज येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसच्यावतीने कृषी कायद्यांच्या विरोधात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा सुषमाराजे घोरपडे, पश्चिम महाराष्ट्र असंघटित महिला विभागाच्या अध्यक्षा वैशाली जाधव, काँग्रेसचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव, प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य मारुतराव जाधव, कॅ. इंद्रजित जाधव, विकास जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
‘केंद्र सरकारने देशाच्या जनतेचा विश्वासघात केलेला आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कृषी कायदे पारित केले असून, हे काळे कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस पक्ष विरोध करणारच,’ असे सुषमाराजे घोरपडे व वैशाली जाधव यांनी सांगितले.
तालुकाध्यक्ष हेमंतराव जाधव यांनी, केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. त्यांनी कृषी कायदे तातडीने रद्द करावेत, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला.
अजितराव पाटील-चिखलीकर, कॅ. इंद्रजित जाधव, जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात, शंकरराव पवार, शंकरराव खोत यांनीही मनोगत व्यक्त केले.
आंदोलनस्थळी तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.