सातारा : ‘वयाच्या ८३ व्या वर्षी ही उर्मी आणि प्रचंड ऊर्जा घेऊन आज एखाद्या तरुणाला लाजवेल असे कार्यमग्न राहत साऱ्या समाजाच्या उद्धारासाठी एक व्रत म्हणून जीवन जगणाऱ्या रमणलाल शहा यांना आता पुढील संत साहित्याच्या अभ्यास व निर्मितीसाठी परमेश्वराने मोठे बळ आणि ऊर्जा द्यावी,’ असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक, मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. येथील सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा पहिला ‘जीवनगौरव’ पुरस्कार येथील ज्येष्ठ ज्योतिषतज्ज्ञ प्राचार्य रमणलाल शहा यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. डॉ. प्रतिभा मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद अॅड. दत्तात्रय बनकर, दीपलक्ष्मीचे संस्थापक अध्यक्ष शिरीष चिटणीस, नगरवाचनालयाचे कार्यवाह डॉ. शाम बडवे, पतसंस्थेचे महाव्यवस्थापक विनायक भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना रमणलाल शहा म्हणाले, ‘एखाद्याला पुरस्कार मिळणे म्हणजे त्याच्या कार्याची समाजाने दिलेली ही पोहोच पावती होय. सातारा जिल्हा तसेच अनेक ज्ञात, अज्ञात ठिकाणच्या प्रेम करणाऱ्या माणसांच्या स्रेहाने मी चिंब झालो आहे. साताऱ्याच्या व्यासपीठावर हा पुरस्कार मला प्रथमच मिळत आहे याचा मनस्वी आनंद वाटतो. संत तुकारामांच्या वरील ‘आनंदाचे डोही’ या पुस्तकाची पहिली आवृत्ती केवळ १० महिन्यांत संपली म्हणून आज या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आपण प्रकाशित करत आहोत. आज समाजात वाढत चालेला दुरावा, तेढ, नाते संबंधातील दुरावा वाढत आहे. हे टाळण्यासाठी मन सतत प्रसन्न आणि आनंदी ठेवा चित्ती समाधान ठेवले नाही तर आपले आरोग्य चांगले राहणार नाही. मी वयाच्या ९० पर्यंत संत साहित्यावर लिहित राहणार आहे व त्यासाठी परमेश्वराने मला बळ द्यावे.’ या समारंभास अर्थतज्ज्ञ पी. एन. जोशी, अरुण गोडबोले, संभाजीराव पाटणे, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, बाळासाहेब प्रभूणे, नितीन शहा, विजया शहा, केतन शहा, विनायकराव आगाशे, दीपलक्ष्मीच्या उपाध्यक्षा सुरेखा रानडे, महालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष अन्वर शेख, बाळासाहेब नारकर, राजेश चिटणीस, साहेबराव होळ, सी. के. शहा, रमण वेलणकर, वसंतराव फडतरे, विठ्ठलराव जाधव, आप्पा शालगर, शिल्पा चिटणीस आदी उपस्थित होते. डॉ. शाम बडवे यांनी सूत्रसंचालन केले. विनायक भोसले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
संत साहित्यासाठी शहा यांंना बळ मिळावे
By admin | Published: August 28, 2016 12:02 AM