लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : ‘घर असावं घरासारखं आणि ते आपलं स्वत:च्या मालकीचं असावं’ हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. गावातील लोकांचं हेच स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी ग्रामपंचायतीने ‘आपलं घर’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम आखला आहे. या योजनेअंतर्गत सर्व ग्रामस्थांना त्यांची मिळकत स्वत:च्या नावावर करून मिळणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात गेली अनेक वर्षे घरांच्या नोंदी प्रलंबित आहेत. अनेकवेळा शासनाच्या अटींमुळे तर अनेकदा मिळकतधारकांच्या अनास्थेमुळे घरांच्या नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधीवरही परिणाम होत आहे. याशिवाय ग्रामस्थांना कागदोपत्री अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निरसण होण्यासाठी घाडगेवाडीचे उपसरपंच हिरालाल घाडगे यांच्या संकल्पनेतून गावात ‘आपलं घर’ योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत १ एप्रिल ते ३० एप्रिल या महिनाभराच्या कालावधीत नोंदी प्रलंबित असलेल्या प्रत्येकाला आपलं घर स्वत:च्या मालकीचं करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या योजनेत मिळकतधारकांना मिळकत उताऱ्यास वारस नोंदी, ज्यांच्या वारस नोंदी झालेल्या आहेत; परंतु सर्व वारसांची नावे एकाच उताऱ्यावर आहेत त्यांचे ८ अ वेगळे करणे, मालकाच्या हयातीमध्ये वारसांचे नावे घर मिळकती करणे आणि नवीन बांधकाम झालेल्या व जुने बांधकामाच्या नोंदी करणे अशा बाबींचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आजपर्यंत रखडलेल्या घरांच्या नोंदी करण्याची संधी ग्रामस्थांना उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
चौकट :
निसर्ग वाचवा योजना...
घाडगेवाडी हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं आहे. या परिसरात मानवी चुकांमुळे जंगलात वारंवार वणवे लागण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे वनसंपदा व वन्यप्राण्यांना त्याचा फटका बसतो. यासाठी वणवा विझविणे आणि वणवा लावणाऱ्या व्यक्तींची माहिती देणाऱ्यास ग्रामपंचायतीने निसर्ग वाचवा योजनेतून एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे नियोजन केले आहे.
कोट :
गावातील अनेक घरांच्या नोंदी प्रलंबित आहेत. त्यामुळे कररूपाने मिळणारे उत्पन्न कमी प्रमाणात येत होते. गावात अनेक नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी ग्रामनिधी आवश्यक आहे. त्यासाठी घरांच्या सक्तीच्या नोंदीची योजना आखली आहे. यामुळे लोकांचाच फायदा होणार आहे. या योजनेचा सर्व मिळकतधारकांनी लाभ घ्यावा.
- हिरालाल घाडगे, उपसरपंच
...................................................