रामापूर : डोंगरपठारावरील घाणबी, ता. पाटण येथील आरोग्य उपकेंद्र डॉक्टरांअभावी गेल्या कित्येक दिवसांपासून बंद होते. त्यामुळे परिसरातील रुग्णांची हेळसांड होत होती. याबाबत नागरिकांनी सत्यजितसिंह पाटणकर यांची भेट घेऊन आरोग्य उपकेंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. तालुका आरोग्य विभागाला घाणबीतील उपकेंद्र सुरू करण्याबाबत सूचना केल्यानंतर याची तत्काळ दखल घेत आरोग्य विभागाने घाणबीतील उपकेंद्र सुरू केल्याने परिसरातील रुग्णांची सोय झाली आहे.
पाटण तालुक्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी त्याकाळी डोंगरपठारावरील दुर्गम ठिकाणी वसलेल्या जनतेच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये. त्यांना स्थानिक ठिकाणीच चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून पाटण तालुक्यात विविध ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे १३ व ६३ आरोग्य उपकेंद्रे सुरू केली. आजही या आरोग्य केंद्रांमार्फत स्थानिक जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या उपकेंद्रांवर डॉक्टरसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्याने काही उपकेंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना पाटण याठिकाणी पायपीट करून आरोग्याच्या सुविधा घ्याव्या लागत आहेत. यामध्ये डोंगरपठारावरील जनतेचा वेळ व पैसादेखील वाया जात आहे. त्यामुळे येथील रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. हे आरोग्य उपकेंद्र तातडीने सुरू करावे म्हणून येथील जागृत नागरिकांनी सत्यजितसिंह पाटणकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी केली होती. तसे निवेदनही पाटण तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. त्यानुसार सत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण तालुका आरोग्य विभागाशी चर्चा करून हे उपकेंद्र तत्काळ सुरू करावे, अशा सूचनाही केल्या होत्या.
आरोग्य विभागाच्या टीमने घाणबी उपकेंद्रास भेट देऊन पाहणी केली व येथील नागरिकांशी चर्चा केली. यावेळी सोमवार ते गुरुवार याठिकाणी ओपीडी सुरू ठेवण्याचा निर्णय झाला, तसेच इतर दिवशी लसीकरण, कोरोना तपासणी व नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करण्यावर भर देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी घाणबीचे सरपंच प्रकाश सपकाळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष नारायण सपकाळ, रमेश शिंदे, राजेश शिंदे, माजी सरपंच आनंदा सपकाळ, गणपत यादव, सतीश सपकाळ, मधुकर कदम यांच्यासह घाणबीतील नागरिक उपस्थित होते.
फाटो..
घाणबी उपकेंद्राची डॉ. आर. बी. पाटील, समवेत डॉ. ए. एस. खंडागळे, मुसा चाफेरकर, एम. व्ही. पाटोळे, एस. एम. पोळ, यू. व्ही. झांबरे आदींनी पाहणी केली.