पेट्री : सातारा - कास मार्गावरील घाटाई रस्त्यावर शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळली. यामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाल्याने परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शहराच्या पश्चिमेला कास पठार परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत, रस्ते खचले आहेत, घरांची पडझड झाली असून, शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कित्येक पूल पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, कास परिसरातील घाटाई रस्त्यावर कासाणी गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर शुक्रवारी रात्री मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून मुरूम, झाडे, माती, दगड पूर्णतः रस्त्यावर आले आहेत. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
कासाणी गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर मधोमध दरड पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प होऊन दरड पडलेल्या ठिकाणापासून पलीकडील चार गावांना दळणवळणात अडथळा निर्माण झाल्याने या मार्गावर कोसळलेली दरड संबंधित विभागाने तत्काळ हटविण्याची मागणी ग्रामस्थ, वाहनचालकांतून होत आहे.
(कोट)
रस्त्याच्या मधोमध मोठ्या प्रमाणात दरड पडल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. दुधाची गाडी गावापर्यंत पोहोचत नसल्याने कित्येक मैल पायपीट करून सकाळी दूध घालायला जाण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.
- प्रदीप शिंदे, ग्रामस्थ, कासाणी, ता. सातारा
सातारा - कास मार्गावर घाटाई रस्त्यावर दरड कोसळल्याने या भागातील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.
छाया - सागर चव्हाण