पेट्री : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने गर्दी होणाऱ्या यात्रांवर बंदी कायम ठेवली असल्याने तहसीलदार आशा होळकर यांनी केलेल्या सूचनेनुसार घाटाई देवस्थान ट्रस्टने दि. ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी हे संपूर्ण चार दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यात्रेदिवशी देवीची महापूजा आरती, मानपान देऊन धार्मिक विधी करीत यात्रा साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे .
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या परळी खोऱ्यात दरवर्षी सर्वांत प्रथम आणि राज्यभरातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत भरणारी घाटाई देवीची यात्रा यावर्षी ३१ जानेवारी रोजी भरणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी जमणाऱ्या यात्रांवर बंदी कायम ठेवल्याने घाटाई देवस्थान ट्रस्टने प्रशासनाच्या सूचनेनुसार यावर्षीची घाटाई देवीची यात्रा देवस्थान ट्रस्ट पुजारी व गावातील मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत देवीची महापूजा, आरती, मानपान, धार्मिक विधी करून साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्राकाळात चार दिवस मंदिर परिसरात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यावर बंदी असून मंदिर परिसरात इतर गावच्या सासनकाठ्या पालख्या व मिरवणुकीवरही बंदी असून कोणत्याही प्रकारचे दुकाने लावण्यासही बंदी घातली आहे.