कऱ्हाड : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा निकाल विद्यापीठाने शनिवारी ‘आॅनलाईन’ जाहीर केलाय. सोमवारपासून विद्यार्थ्यांची दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची गडबडही सुरू होईल; पण विद्यापीठ नियमानुसार फॉर्म भरण्याची मुदत संपून गेल्याने ‘लेट फी’चं काय, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.कऱ्हाडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची प्रथम सत्र परीक्षा डिसेंबर २०१४ मध्ये संपल्यानंतर ४५ दिवसांत विद्यापीठाकडून निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, मुदत संपूनही निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांनी विद्यापीठात संपर्क साधला असता निकाल राखून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘तुमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक पेपर तपासणीसाठी आले नाहीत,’ असे कारण सांगत विद्यापीठाने निकाल जाहीर करण्यास नकार दर्शविला. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला शनिवारी ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर त्याच दिवशी दुपारी विद्यापीठाने घाईगडबडीत निकाल जाहीर केला. मात्र, दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना ‘लेट फी’ भरावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रथम सत्राचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून आठ दिवसांची मुदत दिली जाते. यावर्षी इतर महाविद्यालयांचा प्रथम सत्राचा निकाल विद्यापीठाने १६ जानेवारीला जाहीर केला होता. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांतील दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाली आहे. मात्र, कऱ्हाडच्या महाविद्यालयाचा निकाल विद्यापीठाने तब्बल पंधरा दिवस उशिराने जाहीर केला असल्यामुळे येथील तेराशे विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतच नसल्याने त्यांना विलंब शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. वास्तविक, विद्यापीठ व महाविद्यालयात सुसंवाद नसल्यामुळे निकाल जाहीर होण्यास उशीर झाला. त्यामुळे दुसऱ्या सत्राचा फॉर्म भरण्याची मुदतही संपून गेली. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांचा काहीही दोष नाही. असे असताना विलंब शुल्क आकारल्यास तेराशे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. एका समस्येतून सुटका होत असतानाच विद्यार्थी दुसऱ्या समस्येत अडकले आहेत. अनेकजण घरापासून दूर राहून शिकत आहेत. राहण्याचा खर्च करून ‘लेट फी’ही भरावी लागली तर त्यांचे अर्थकारण कोलमडून पडणार आहे. (प्रतिनिधी)निकाल जाहीर करण्यास अगोदरच विद्यापीठाने उशीर केला. त्यामुळे दुसऱ्या सत्राचा परीक्षा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क घेऊ नये. फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून मिळावी. सोमवारी याबाबत आम्ही प्राचार्यांची भेट घेणार आहोत.- मंगेश सुरूसे, विद्यार्थी जनरल सेक्रेटरी पेपर पुनर्तपासणीची मुदत संपल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यातच विलंब शुल्क आकारल्यास विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असून, विद्यापीठाने पुनर्तपासणी व परीक्षा फॉर्म भरण्यासाठीची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे. - पवन घोडस्कार, विद्यार्थीपेपर पुनर्तपासणीचाही प्रश्नपेपर पुनर्तपासणीची विद्यार्थ्याला आवश्यकता वाटल्यास निकाल जाहीर झाल्यानंतर आठ दिवसांत तसा आॅनलाइन फॉर्म भरणे गरजेचे असते. फॉर्म भरल्यानंतर काही दिवसात संबंधित विद्यार्थ्याला विद्यापीठाकडून त्याने मागणी केलेल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत पाठविली जाते. ती प्राध्यापक किंवा कोणत्याही तज्ज्ञाकडून तपासून पुन्ही ती विद्यार्थ्याने विद्यापीठात जमा करायची असते. त्यानंतर काही दिवसांनी पुनर्तपासणीचा निकाल जाहीर करण्यात येतो. मुदत संपल्याने कऱ्हाडच्या विद्यार्थ्यांना सध्या पुनर्तपासणीचा फॉर्मही भरता येत नाही.
विद्यार्थ्यांच्या मानगुटीवर ‘लेट फी’चं भूत!
By admin | Published: February 01, 2015 10:39 PM