कऱ्हाड : भूत म्हणजे कल्पनेने रचलेली एक विचित्र आकृती. ‘भूत’ नावाचा कसलाही प्रकार अस्तित्वात नाही, हे वेळोवेळी सांगितलं जातं. वैज्ञानिकदृष्ट्या ते स्पष्टही केलं जातं. मात्र, भुताच्या नावाखाली सुरू असलेला तंत्र-मंत्राचा खेळ थांबायला तयार नाही. कऱ्हाडात वन विभागाने जप्त केलेल्या वाघनख्या हा त्याच खेळातील एक भाग असून, अटक केलेल्या आरोपीनेच चक्क एक नखी ‘लॉकेट’मध्ये घालून गळ्यात अडकविली होती.
वाघ आणि बिबट्या हे मनुष्यासाठी निरुपद्रवी प्राणी. या दोन्ही प्राण्यांचा आणि मनुष्याचा तसा फारसा संबंध येत नाही. हे दोन्ही प्राणी त्यांच्या अधिवासात, त्यांच्या दिनचर्येने जगत असतात. मात्र, अंधश्रद्धेच्या नावाखाली या प्राण्यांचा आणि मनुष्याचा संबंध जोडला गेला आहे आणि तो संबंधच या प्राण्यांच्या जिवावर उठला असल्याचे दिसते. वाघ अथवा बिबट्याच्या नख्या सोबत ठेवल्या तर भूतबाधा होत नाही, नखीला भूत घाबरते, अशी पोरकट अंधश्रद्धा पसरविली गेली आहे आणि काही जण या अंधश्रद्धेला भुलले आहेत. ज्यामुळे या नख्यांची तस्करी करण्यासाठी प्राण्यांचा बळी घेतला जात असल्याचे दिसते.
वास्तविक, वाघ हा अन्नसाखळीतील सर्वांत टोकाचे स्थान भूषवितो, तर बिबट्याही याच मार्जार कुळातील महत्त्वाचा प्राणी मानला जातो. या दोन्ही वन्यजीवांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विशेष दर्जा आहे. मात्र, तरीही या दोन्ही प्राण्यांची अंधश्रद्धेपोटी शिकार केली जाते, हे दुर्दैव. कऱ्हाडात नख्यांच्या तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अंधश्रद्धेतच गुरफटल्याचे दिसून येत आहे. दिनेश रावल नावाच्या आरोपीने तर चक्क एका नखीचे ‘लॉकेट’ बनवून ते स्वत:च्याच गळ्यात घातल्याचे वन विभागाला दिसून आले. ते लॉकेटही जप्त करण्यात आले आहे. मात्र, इतर नख्यांचीही ‘लॉकेट’ बनवून ती विकली जाणार होती का, याचा तपास वन विभागाला करावा लागणार आहे.
- चौकट
‘डील’साठी गेला... जाळ्यात अडकला!
गिऱ्हाईक समजून ‘डील’ करण्यासाठी गेलेला दिनेश रावल हा आरोपी वन विभागाच्या जाळ्यात सापडला. त्याने एक नखी दाखविण्यासाठी आणली होती, तर त्याच्या गळ्यात असलेल्या ‘लॉकेट’मध्ये पथकाला एक नखी आढळली, तसेच अनुप रेवणकर या दुसऱ्या आरोपीकडून नऊ नख्या हस्तगत करण्यात आल्या.
- चौकट
‘सोने’री दुकानांचा अन् नख्यांचा संबंध काय..?
१) दिनेश रावल हा आरोपी नख्यांचा व्यवहार करण्यासाठी आल्यानंतर वन विभागाच्या जाळ्यात सापडला.
२) अनुप रेवणकर याला काझी वाड्याजवळ असलेल्या ‘मयूर गोल्ड’ दुकानावर छापा टाकून ताब्यात घेण्यात आले.
३) रेवणकर याच्याकडून वन विभागाने तब्बल नऊ नख्या हस्तगत केल्या.
४) नख्या, लॉकेट आणि ‘सोने’री दुकानांचा संबंध काय, असा प्रश्न या कारवाईमुळे निर्माण झाला आहे.
- कोट
वन्य प्राण्यांची शिकार हा गुन्हा आहे. वाघ अथवा बिबट्याला मारून त्यांच्या नख्या, दातांचे ‘लॉकेट’ गळ्यात घालणे हादेखील अजामीनपात्र गुन्हा आहे. वन्यजीव कायद्यान्वये या प्राण्यांना उच्च दर्जाचे संरक्षण आहे. कोणाकडेही असे ‘लॉकेट’ असेल अथवा कोणी घालत असेल तर माहिती द्यावी.
- महेश झांजुर्णे
सहायक वनसंरक्षक, सातारा
फोटो : १७केआरडी११
कॅप्शन : दिनेश रावल या आरोपीने हेच नखीचे लॉकेट गळ्यात घातले होते. वन विभागाने ते जप्त केले आहे.
फोटो : १७केआरडी१२
कॅप्शन : प्रतीकात्मक