सातारा : सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धा आता साता समुद्रापार गेली आहे. या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला असून भारतामध्ये अशा केवळ आठ मॅरेथॉन असून सातारा हिल मॅरेथॉन ७ नंबरला आली आहे. त्यामुळे ही स्पर्धा गिनिज वर्ड रेकॉर्डमध्ये समाविष्ट होण्यासाठी लंडन येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय नामांकित संस्थेकडे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक समितीच्या वतीने डॉ. चंद्रशेखर घोरपडे यांनी दिली.इंग्लंडची आंतरराष्ट्रीय अॅमॅच्युअर अॅथलेटिक फेडरेशन व असोसिएशन आॅन लाँग डिस्टन्स रनिंग यांची मान्यताप्राप्त ही मॅरेथॉन स्पर्धा आहे. सर्वात जास्त स्पर्धक डोंगरावर धावून हाफ मॅरेथॉन पूर्ण करण्याचे एक आगळे वेगळे रेकॉर्ड प्रस्थापित करण्यासाठी अर्ज करून त्यांना स्पर्धेबाबत संपूर्ण माहिती कळविली होती. या संस्थेच्या सर्व निकषांमध्ये आपण पात ठरत असल्यामुळे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेने आपल्याला रेकॉर्ड करण्याची संधी दिली आहे. या रेकॉर्डसाठी २१ किलोमीटर या विभागात ३ हजार स्पर्धकांचा सहभाग असणे गरजेचे आहे.३० जूनपर्यंत झालेल्या नावनोंदणीत २ हजार ५९३ अर्ज आले आहेत. यामध्ये २ हजार १३६ स्पर्धक साताऱ्याबाहेरील आहेत. ४५७ स्पर्धक साताऱ्यातील आहेत. साडेसात किलोमीटरसाठी एकूण १ हजार ८५० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. साताऱ्यातील ज्या स्पर्धकांनी साडेसात किलोमीटरसाठी नोंदणी केली आहे. त्यांना जर २१ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करावयाची असेल तर तशी संधी देण्यात आली आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)साताऱ्यात १९ जुलैला मशाल रॅलीचे आयोजनसातारा हिल मॅरेथॉनची स्पर्धा ६ सप्टेंबरला होणार असून तत्पुर्वी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने १९ जुलैला साताऱ्यात मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ही स्पर्धा योग्य रितीने पार पाडण्यासाठी पोलीस परेड मैदान ते प्रकृती हेल्थ रिसॉर्ट या मार्गावर स्वच्छता करण्याचे नगर पालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला आवाहन करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर संयोजक समितीचे कार्यकर्तेही या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेतील स्पर्धकांनी जर रेकॉर्ड पूर्ण केले.तर स्पर्धेत भाग घेणाऱ्या व २१ किलोमीटर अंतर पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड संस्थेकडून स्वत:चे स्वतंत्र असे प्रमाणपत्र वेगळे पैसे भरून मिळणार आहे. याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
‘गिनिज बुक’मध्ये होणार हिल मॅरेथॉनची नोंद !
By admin | Published: July 08, 2015 10:08 PM