मलकापूर : ‘जखिणवाडी गावाने ऐक्यात सातत्य राखत विविध योजना यशस्वी केल्या आहेत. देशातील पहिले सौरग्राम होण्याचा बहुमान त्यांनी मिळविला. शासनाच्या पातळीवरील विविध १३ पुरस्कार प्राप्त करून पुरस्कारांच्या रकमेतूनही गावाचाच विकास केला हा एक राज्यातील इतर गावांना आदर्श आहे. भविष्यातही या गावासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही,’ अशी ग्वाही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. जखिणवाडी येथे भारतातील पहिल्या सौरग्राम प्रकल्पासह विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. मुदगल म्हणाले, ‘आदर्श गावाला अपेक्षित सुविधांसाठी निधी व योजना ‘तुम्ही मागा आम्ही देतो; मात्र युवा पिढीला उत्तम संस्कार व चांगले विचार देऊन सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. जखिणवाडीला पौराणिक व ऐतिहासिक वारसा आहे. लाठी-काठी, दांडपट्टा यासारख्या मर्दानी खेळांची जोपासनाही या गावाने केली आहे. हा एक आदर्श आहे.’ सरपंच नरेंद्र पाटील यांनी पाच वर्षांत गावात यशस्वीपणे राबविलेल्या कोट्यवधींच्या योजनांची याशोगाथा सांगणारे पुस्तक जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व अधिकाऱ्यांना सुपूर्त केले. सर्व अधिकारी गावात एकत्र उपस्थित असल्याचे पाहून सरपंचांनी भक्त निवासासह पर्यटन क्षेत्रासाठी निधीची मागणी केली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी सूत्रसंचालन केले. प्रांताधिकारी किशोर पवार यांनी प्रास्ताविक केले. गटविकास अधिकारी अविनाश फडतरे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)पाच लाख येणे आहे ते द्या... जखिणवाडीने आत्तापर्यंत १३ पुरस्कार मिळविले, त्यातून २५ लाखांची कामे बक्षिसाच्या रकमेतून केली. सर्व अधिकाऱ्यांना उद्देशून सरपंच नरेंद्र पाटील यांनी एका उपक्रमासाठी गावाला पाच लाखांचे बक्षीस जाहीर झाले आहे. मात्र, ती पाच लाखांची रक्कम अजून मिळालेली नाही, ते शासनाकडून येणे आहे ते द्या,’ अशी विनंती अधिकाऱ्यांना केली. आठ किलोमीटरचे पाणंद रस्ते खुलेगावाच्या दृष्टीने अडचणीचा विषय ठरलेले विविध ठिकाणचे आठ किलोमीटर लांबीचे पाणंद रस्ते खुले करण्यात आले. या पाणंद रस्त्याला सर्व शेतकऱ्यांनी विनामूल्य जागा देऊन एकमुखी संमती दिली. त्यापैकी काही रस्त्यांच्या खडीकरणाचाही भूमिपूजन समारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
जखिणवाडी राज्याला आदर्श देईल : मुदगल
By admin | Published: September 30, 2015 10:19 PM