सातारा : आई-वडिलांवर रागवून एका अल्पवयीन सतरा वर्षीय मुलीने घर सोडले. सातारा बसस्थानकात आल्यानंतर पोलिसांनी सतर्कता दाखवून मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना बुधवारी रात्री साडेआठवाजता घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस हवालदार दत्ता पवार, पोलीस नाईक अरुण दगडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पवार, अजयराज देशमुख हे कर्मचारी बसस्थानकात बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास पेट्रोलिंग करत असताना एक मुलगी एकटीच बसलेली त्यांना दिसली. मुलीच्या हालचाली शंकास्पद वाटल्याने त्या मुलीस चौकशीसाठी एसटी स्टँड पोलीस चौकी येथे घेऊन जाऊन त्यांनी विचारपूस केली. त्यावेळी तिने सांगितले, ‘मी माझ्या आई-वडिलांसोबत पुणे (चिखली प्राधिकरण पिंपरी चिंचवड पुणे) येथे राहत आहे. सध्या मी बारावी सायन्समध्ये शिकत आहे. परंतु आमच्या चाळीत राहणाऱ्या एका मुलाशी माझे प्रेमसंबंध असून, त्याबद्दल माझ्या वडिलांना कळल्याने त्यांनी मला माझ्या आजोबांकडे कोल्हापूर येथे पाठविले. परंतु मला कोल्हापूर येथे राहायचं नसल्याने आजोबा मला पुसेगाव यात्रेला घेऊन आले होते. तेथून मी त्यांची नजर चुकवून पळून सातारा येथे आलेले आहे. सातारा येथे आल्यानंतर मी माझ्या मित्राला फोन करून सातारा येथे बोलावले होते. परंतु माझे आई-वडील हे चिखली पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड येथे जाऊन माझ्या मित्राच्या विरुद्ध माझ्या अपहरणाची तक्रार देत आहेत. फोन करून पोलीस स्टेशनला त्याला बोलावून घेतले आहे. त्यामुळे तो मला नेण्यासाठी सातारा येथे येऊ शकत नाही म्हणून मी माझ्या आई-वडिलांवर रागावून एकटीच एसटी स्टँड सातारा येथे आले.’
एसटी स्टँड पोलीस चौकीतील पोलिसांनी तत्काळ मुलीच्या आई-वडिलांना फोन करून तुमची मुलगी साताºयात असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री उशिरा संबंधित अल्पवयीन मुलीचे आजोबा आल्यानंतर त्या मुलीस त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित मुलगी सुरक्षितपणे पालकांच्या स्वाधीन झाली.