लोणंद : सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरासमोरील रस्त्यावरून चालत जात असताना भरधाव आलेल्या वाळूच्या ट्रकने तीन वर्षांच्या बालिकेला चिरडल्याची हृदयद्रावक घटना पाडेगाव (ता. फलटण) येथे शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातानंतर चालकाने तेथून पलायन केले. अर्चना रोहिदास पवार (वय ३, रा. पाडेगाव, ता. फलटण) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बालिकेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी झोपून उठल्यानंतर घरासमोरील रस्त्याकडेने अर्चना चालत निघाली होती. त्यावेळी साखरवाडीकडून आलेल्या वाळूच्या ट्रकने (एमएच ११ एएल २११९) अर्चनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर तिच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने तेथून पलायन केले. घटनास्थळाचे चित्र अत्यंत विदारक होते. अर्चनाचा अपघात झाल्याची माहिती तिच्या आई, वडील, भाऊ, बहीण यांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्चनाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहून त्यांनी प्रचंड आक्रोश केला. पाडेगाव येथे रस्त्याकडेलाच पवार कुटुंबाचे झोपडीवजा छोटेसं घर आहे. अवजारे तयार करून पवार कुटुंबीय आपला उदरनिर्वाह चालवितात. पोटच्या गोळ्याचा घरासमोरच असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पवार कुटुंबावर अक्षरश: डोंगर कोसळला आहे. पोलीसपाटील मारुती मदने यांनी लोणंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र औटे अधिक तपास करीत आहेत. अजून किती बळी घेणार? भरधाव होणारी वाहतूक आणि वाळूमाफियांची सुरू असलेली घाईगडबड यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. प्रशासन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वाळूमाफियांना चाप लावणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (वार्ताहर)
ट्रकखाली चिरडून बालिका ठार
By admin | Published: June 28, 2015 12:30 AM