पेट्री : शिवजयंती जल्लोषात साजरी होत असताना शिवकालातील चारशे वर्षांपूर्वीची शिवकालीन मर्दानी खेळांची परंपरा घरातघर (ता. जावळी) येथील कै. नानू सुर्वे यांच्या घरातील तिसऱ्या पिढीतील मुली तसेच मुले या खेळाचे हात शिकत ही परंपरा पुढे कायम राखत आहेत.
गांजे गावच्या पोटातील घरातघर हे छोटेशे गाव. या गावात शिवकालीन दांडपट्टा, लाठीकाठी, जाळकाठी, तलवारबाजी या पारंपरिक खेळांचा सर्वांनाच छंद. पण, कै. नानू सुर्वे यांनी यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवून गावातील प्रत्येक घरात हा खेळ रुजण्यासाठी प्रयत्न केले. हे करताना आपल्या घरापासून सुरुवात करत आपल्या मुलांना तरबेज बनवले. आज याच नानू सुर्वे यांच्या कुटुंबातील त्यांची परतवंडे असणारी छोट्या मुली व मुले हा वारसा पुढे नेत आहेत.
नानू सुर्वे यांच्या निधनानंतर त्यांची मुले गणपत सुर्वे, रामचंद्र सुर्वे, लक्ष्मण सुर्वे व दादू सुर्वे यांनी ही परंपरा कायम राखत या खेळाचा वसा आपल्या मुलांना दिला. यामध्ये भरत सुर्वे, ज्ञानेश्वर सुर्वे, लहू सुर्वे, मुकुंद सुर्वे, महेश सुर्वे या सर्वांनीच ही परंपरा जपत खेळ चालू ठेवले. स्वत: खेळण्याची जिद्द ठेवत आपल्या घरातील लहान मुली व मुलांना या मर्दानी खेळाचा वारसा दिला.
गरागरा काठी फिरवायची अशी की, दहा जण मागे सरले पाहिजेत. दांडपट्ट्याच्या तडाख्याने ठेवलेल्या वस्तूची चिरफाड करायची तर दोन्ही बाजूने पेटवलेल्या जाळकाठीने स्वतःभोवती आगीचे चक्र करायचे, असे कौशल्य या कुटुंबातील सर्वांनीच लिलया हस्तगत केले आहे. याच मर्दानी खेळांची परंपरा फक्त कुटुंबातील पुरुषांपुरती मर्यादित न ठेवता मुलींनाही देत या सर्व गोष्टी शिकवल्या आहेत.
आता नानू सुर्वे यांच्या तिसऱ्या पिढीतील त्यांची परतवंडे असणाऱ्या मुलीही हे शिवकालीन खेळ मनापासून शिकून खेळत आहेत.
यामध्ये जान्हवी लहुदास सुर्वे व वैभवी भरत सुर्वे यांनी चांगली तयारी केली आहे, तर छोट्या मुलांनीही लाठीकाठी व जाळकाठी फिरवण्यात प्रावीण्य मिळविले आहे. या खेळातून मुलींना स्वसंरक्षणाबरोबरच समाजात निर्भयपणे फिरण्याचा आत्मविश्वास मिळत आहे.
चौकट
सुर्वे कुटुंबातील ७८ वर्षांचे लक्ष्मण सुर्वे आजही त्याच तडफेने हे खेळ दाखवतात. त्याचबरोबर आपल्या नातींना या खेळात तयार करण्याचेही काम ते फावल्या वेळात करत असतात. इतर इच्छुक तरुणांना ही त्यांच्याकडे आल्यास हे खेळ शिकवण्याची त्यांची तयारी असते.
(कोट )
दांडपट्टा, लाठीकाठी या शिवकालीन खेळांमुळे चपळता, लवचिकता व शारीरिक क्षमता वाढून निरोगी जीवन जगण्यास मदत होते. त्यामुळे आत्ताच्या मोबाइल व टीव्हीच्या आहारी जाणाऱ्या तरुण पिढीने या शिवकालीन ऐतिहासिक खेळांकडे वळून परंपरा पुढे चालवावी.
-दादू सुर्वे, पैलवान, घरातघर, ता. जावळी
१९ पेट्री
कॅप्शन : घरातघर (ता. जावळी) येथील दांडपट्टा फिरवताना सुर्वे कुंटुबातील लहानग्या वैभवी व जान्हवी.