सातारा : जिल्ह्यातील खिरखिंडी येथील मुलींना शाळेत जाण्यासाठी बोटीतून प्रवास करावा लागतो. हे वास्तव माध्यमांनी मांडल्यानंतर त्याबाबत उच्च न्यायालयात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान, न्यायाधीश प्रसन्ना वराळे यांच्या खंडपीठाने गावामध्ये हेलिपॅड असावेत, याबाबत काही म्हणणे नाही. मात्र, विद्यार्थ्यांना किमान शाळेत जाण्यासाठी चांगले रस्ते असले पाहिजेत, असे म्हटले आहे. याबाबत राज्याच्या सचिवांनी बैठक घेऊन कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी खिरखिंडी येथील मुलींना शाळेत जाण्यासाठी कोयनेच्या बँक वॉटरमधून बोट चालवत जावे लागते, त्यानंतर जंगलातून प्रवास करत शाळेत पोहचावे लागते, अशी बातमी प्रसारित झाली होती. याची दखल घेत उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली होती. त्यावर सुनावणीदरम्यान न्यायालयाने गुुरुवारी राज्याच्या मुख्य सचिवांना याबाबत संबंधित विभागांची बैठक घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने या सूचना देण्यात आल्या आहेत. हे स्पष्ट करताना न्यायालयाने सातारा जिल्ह्यातील गावामध्ये दोन हेलिपॅड आहेत. पण विद्यार्थ्यांना जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नाही, अशीही टिपणी केली आहे. गावामध्ये हेलिपॅड असावे, याबाबत काहीच अडचण नाही. पण, विद्यार्थ्यांना शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी रस्ते आवश्यक आहेत. याबाबत राज्य सरकारने सकारात्मक पावले उचलून जे शक्य आहे त्याप्रमाणे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सातारा जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे मुख्य सचिवांनी अर्थ, ग्रामीण विकास, शिक्षण आणि सामाजिक न्याय या विभागांची बैठक घ्यावी आणि बैठकीनंतर कायमस्वरूपी काय उपाययोजना करता येतात, याबाबत अहवालही आवश्यक त्या शपथपत्रांसह ३० ऑगस्टपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड, पूल, रस्ते अशक्यचन्यायालयाने मुख्यमंत्र्यांच्या गावात हेलिपॅड आहेत, असा उल्लेख केलेला नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावात जाण्यासाठी दोन हेलिपॅड तयार करण्यात आली आहेत, ही वस्तुस्थिती आहे. खिरखिंडी या गावचे पुनर्वसन झाले असून याठिकाणी आता फक्त चार घरे आहेत. कोयनेच्या बँक वॉटरच्या पलीकडे हे गाव असल्याने त्यांना जाण्यासाठी केवळ बोटीचाच आधार घ्यावा लागतो. त्याठिकाणी रस्ते किंवा पूल करणे शक्य नाही.