सातारा : जावळी तालुक्यातील दुर्गम खिरखंडी गावातील मुलींच्या शिक्षणासाठीच्या तळमळीचे वृत्त ‘कोयनामाई पार करीत सावित्रीच्या लेकी घेताहेत शिक्षण’ या मथळ्याखाली २० जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध झाले होते. या मुलींच्या संघर्षाची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून, याबाबत सुमोटो याचिका दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत न्यायमूर्ती प्रसन्न वारळे आणि अनिल किलोर यांनी म्हटले आहे की, बोटीचे सारथ्य स्वत: करत शिवसागर जलाशयातून प्रवास, तेथून पुढे जंगलातून चार किलोमीटर चालत साहसी प्रवास या मुलींचे ध्येय, चिकाटी, खडतर परिश्रम प्रतिबिंबित करतो. राज्यातील काही शाळा साथीच्या परिस्थितीमुळे बंद झाल्या असल्या तरी खिरखंडी गावातील विद्यार्थी हे रोजचा नित्यक्रम करून शाळेत उपस्थित राहत आहेत.एकीकडे मुलींना येणाऱ्या संकटांचे प्रतिबिंब आणि दुसरीकडे या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक कारकीर्द घडविण्याची हिंमत, इच्छाशक्ती, दृढ निश्चय दिसून येतो. न्यायमूर्ती पुढे म्हणतात की, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ हे घोषवाक्य असताना राज्याकडून मुलींना सुरक्षित रस्ता आणि मैत्रीपूर्ण वातावरण प्रदान करणे हे प्रथम कर्तव्य आहे. तरच हे घोषवाक्य साध्य करता येईल हे सांगण्याची गरज नाही.
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्याच्या खिरखंडी गावातील मुलांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करू शकते. मुलांचे आणि विशेषतः मुलींच्या धैर्याचे आणि इच्छाशक्तीचे कौतुक करताना आम्हांला आम्ही ‘सावित्रीच्या लेकी’ या कवितेचे शब्द आठवतात, असा आवर्जून उल्लेखही न्यायालयाने केला आहे.
काव्यपंक्तीमधून सांगताना न्यायालय म्हणते...
पंखात आता आमच्याही बळ सिद्ध करण्याची आहे तळमळ नका करू आता कोणीही रेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी असे सांगून आम्ही रजिस्ट्रीला पुढील आदेश, निर्देशांसाठी प्रकरण योग्य खंडपीठासमोर रोस्टर असाइनमेंटनुसार ठेवण्याचे निर्देश देतो, असे शेवटी नमूद केले आहे.
‘लोकमत’ने समस्या मांडल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक
‘लोकमत’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर या मुलींना मदत करण्याची तयारी अनेकांनी दाखवली. बातमीमुळे मुलींच्या संघर्षाची दखल न्यायालयाने घेतल्याने लवकरच त्याना मदत मिळेल. ‘लोकमत’ने समस्या मांडल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.