आदर्की : वीजवितरणाच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांनी घरगुती वीजपुरवठा खंडित करताना दिव्यांगबांधवांचा वीजपुरवठा खंडित करू नये व वीजबिलात सवलत देण्याची मागणी दिव्यांग प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली.
आदर्की बुद्रुक, ता. फलटण येथील वीजवितरणचे कनिष्ठ अभियंता नीलेश ईराबत्ती यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गत महिन्यात निवेदन देऊनही फलटण तालुक्यात दिव्यांगबांधवांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या तक्रारी संघटनेकडे आल्याने आदर्की बुद्रुक येथे दिव्यांगबांधवांचा वीजपुरवठा खंडित करू नये. वीजबिलात सवलत देऊन बिल भरण्यास कालावधी द्या, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बगले, महेश चव्हाण, चंद्रकांत निंबाळकर, महेश जाधव, संदीप सावंत, खंडेराव खुस्पे, दत्तात्रेय दुराडे, सुनील धुमाळ, धनाजी शिंदे उपस्थित होते.