मलटण :
‘लाॅकडाऊन काळात घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजमध्ये बलुतेदारा॑चा समावेश करण्यात यावा,’ अशी मागणी राज्य बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र भागवत यांनी केली आहे.
लाॅकडाऊन जरुर करा; पण छोटे शेतकरी, वंचित उपेक्षित असंघटित बेरोजगार, ग्रामीण छोटे कारागीर, नाभिक, परीट, छोटे व्यावसायिक चर्मकार, फूल विक्रेते बलुतेदार यांचा शासनाने विचार करणं गरजेचं आहे.
या छोट्या कारागिरांनी सहकारी पतसंस्था, बँकांचे कर्ज काढून आपल्या व्यवसाय चालवून आपला चरितार्थ चालवित आहेत. गतवर्षीच्या लाॅकडाऊनमुळे हा वर्ग पूर्णपणे अडचणीत आला आहे. कोरोना साथीचा उपद्रव कमी झाला, व्यवसाय हळूहळू पुन्हा सुरू होऊ लागले. व्यवसाय पुन्हा वेगाला लागताच पुन्हा यावर्षी कोरोनाचे वादळ घोंगावत वेगाने प्रसार वाढू लागला. रोजरोज लाॅकडाऊनच्या भीतीखाली असतानाच एकदाचा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला. पण छोट्या व्यावसायिकांना पुन्हा आपले व्यवसाय शासनाने बंद करण्याचा आदेश दिला.
केस कर्तनालय, लाँड्री, झाडू, दोरखंड व्यवसाय बंद असल्याने मोठ्या आर्थिक नुकसानीची शासनाने काळजी घेणे गरजेचे आहे. या व्यावसायिकांना इतरांप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक नियम लावून व्यवसाय सुरू करण्यास मुभा देणे गरजेचे असताना मोठ्या कंपन्या सुरू ठेवून छोटे व्यावसायिक मारण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसून येत आहे.
नोंदणीकृत कामगारांना महिना १५००, बिगर नोंदणीकृत व्यवसाय ग्रामीण भागात जास्त आहेत. नगरपालिका ग्रामपंचायतींनी आपल्या परिसरातील व्यवसाय नोंदणी करणे बंधनकारक केले जात नाही. बोगस नोंदणीधारक अनुदान लाटतात छोट्या व्यवसायांना काहीच मिळत नाही. लाॅकडाऊन जरुर करा; पण वंचित उपेक्षित असंघटित क्षेत्रातील बलुतेदार वर्ग यांच्या पोटापाण्याचा विचार होणे गरजेचे आहे,’ असे भागवत यांनी सांगितले.